यंदा सलग सहा महिने पडलेल्या पावसामुळे हापूस आंबा पिकांचं कसं होणार, अशी चिंता बागायतदारांना होती; मात्र नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने विराम घेतल्यानंतर पावस परिसरात थंडीचे आगमन झाले. परिणामी, आंबा बागेमध्ये औषध फवारणीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. आंबा हंगाम सुरू झाला असून, बागांच्या रखवालदारीसाठी नेपाळी गुरख्यांचे आगमनही सुरू झाले आहे. पावस परिसरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता प्रत्येक आंबा बागायतदाराने आपल्याकडे येणाऱ्या गुरख्यांची नोंद पोलिस ठाण्यात करावी, असे आवाहन केले आहे. आंबा हंगामाची सुरुवात झाली असून, औषध फवारणीच्या कामालाही वेग आला आहे. स्थानिक पातळीवर मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे मागील दहा वर्षात गुरख्यांचे महत्त्व वाढले आहे. आंबा बागांच्या राखणदारासाठी त्यांचीच नेमणूक केली जात आहे. या नेपाळी रखवालदारांची आंबा बागायतदारांकडे कोणतीही नोंद ठेवली जात नव्हती. त्यामुळे अनेकवेळा अपघात किंवा कोणताही अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांना संबंधितांच्या नातेवाइकांना शोधणे किंवा त्या गुरख्याची ओळख पटवणे यात अडचणी येत होत्या.
दोन वर्षांपूर्वी एका आंबा बागायतदाराच्या बागेत दोघा सख्ख्या भावांनी दुसऱ्या बागेतील गुरख्याचा खून केला होता. या प्रकरणातील संशयित आरोपींचा शोध घेणे कठीण झाले होते. यासाठी पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्यावतीने प्रत्येक भागातील आंबा बागायतदारांनी आपल्या बागेत रखवालदार म्हणून नियुक्त केलेल्या गुरख्यांची संपूर्ण माहिती जमा करावी, अशी सूचना प्रत्येक गावातील पोलीसपाटिलांच्या माध्यमातून करण्यात आली होती; परंतु त्याला मागील वर्षी प्रतिसाद मिळाला नव्हता. शेवटच्या टप्प्यात चारशे गुरख्यांची नोंद झाली. पावस परिसरात आंबा व्यवसाय करणारे सुमारे ८०० ते ९०० बागायतदार आहेत. ते सर्वचजणं गुरख्यांची नोंद करतातच असे नाही. त्यामुळे पोलिसांना तपासकामात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
