Homekhedkhedदापोलीत २४ वर्षांनंतर पारा सहा अंशांपर्यत...

दापोलीत २४ वर्षांनंतर पारा सहा अंशांपर्यत…

थंडीचा कडाका कायम राहिल्यास पुनर्मोहर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिनीमहाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्रच थंडीचा कडाका आहे. मागील तीन दिवसांत पारा सतत खाली घसरत असून, दिवसाही हवेत गारवा जाणवत आहे. मागील २४ वर्षांत दापोलीत जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यांतच पारा सहा अंशांपेक्षा खाली गेलेला होता. तर डिसेंबर महिन्यात अशी नोंद यापूर्वी चार वेळाच झालेली आहे. आज ६.२ अंश सेल्सिअसइतकी नोंद झाली आहे. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, उत्तराखंडमध्ये पुढील काही दिवस शीतलहरी वाहणार आहेत. उत्तरेकडील हे वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत असून, त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टीवरही जाणवत आहे. त्यामुळे किमान तापमानात घट होत आहे. पुढील तीन दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. बदलत्या वातावरणामुळे रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्रच थंडीचा कडाका वाढलेला आहे. हे वातावरण आंब्याला पोषक असून, मोहोर येण्यास सुरुवात झाली आहे. परिसरातील आंबा बागायतदार यांनी आंब्यावर फवारणीला सुरुवात केली आहे. थंडीचा जोर कायम राहिला तरच त्याचा फायदा बागायतदारांना होणार आहे. थंडीचा कडाका कायम राहिल्यास पुनर्मोहर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान केंद्रातील नोंदीनुसार, मागील तीन दिवसांत पारा १ ते ३ अंशांनी खाली घसरलेला आहे. आज पारा ६.२ अंशांची नोंद झाली. काल (ता. १०) पारा ७.२ अंश नोंद होती तर कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस आहे. मागील २४ वर्षांतील कोकण कृषी विद्यापीठाकडील हिवाळ्यातील नोंदी पाहता यंदा डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. दापोली तालुक्यात पारा सर्वात कमी नोंदल्याच्या घटना जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यांत आहेत; मात्र डिसेंबर महिन्यात १३ डिसेंबर १९९९ रोजी ६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. त्यापूर्वी १९८७ मध्ये डिसेंबर महिन्यातील सर्वात कमी नोंद झाली होती. त्यावर्षी सलग तीन दिवस १८, २०, २१ डिसेंबर रोजी अनुक्रमे ५.९, ५.७, ५.९ अंश तापमान नोंदले गेले होते. गेल्या दोन दशकात २०१० मध्ये ७.६ अंशांपर्यंत पारा घसरल्याची नोंद होती. त्यानंतर पारा ८ ते ९ अंशांत होता.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments