HomekonkanChiplunअजितदादांच्या निधनाने 'सह्याद्री' परिवाराची हानी - आमदार शेखर निकम

अजितदादांच्या निधनाने ‘सह्याद्री’ परिवाराची हानी – आमदार शेखर निकम

आमदार शेखर निकम यांच्या जनसंपर्क कार्यालयात शोकसभा पार पडली.

निकम कुटुंबीयांचे शरद पवार यांच्याबरोबर अजित पवारांशीसुद्धा ऋणानुबंध जुळले. अजितदादांच्या निधनामुळे मतदार संघाबरोबर सह्याद्री परिवाराचेसुद्धा अतोनात नुकसान झाले आहे. माझे बाबा गोविंदराव निकम गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आम्हाला कोणाचा आधार होता तो अजितदादांचा. तोच आता गमावला, अशी भावना आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केली. अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी शुक्रवारी सकाळी दहा वाजता आमदार शेखर निकम यांच्या जनसंपर्क कार्यालयात शोकसभा पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूने स्पष्टवक्ता, प्रशासकीय अनुभव असलेला शिस्तप्रिय नेता गमावल्याची भावना सर्वच वक्त्यांच्या भाषणातून व्यक्त करण्यात आली. शोकसभेत बोलताना निकम यांच्यासोबत सर्वच वक्त्यांचा कंठ दाटून आला. निकम म्हणाले, अजितदादांनी चिपळूणच्या वाशिष्टी नदीतील गाळ उपशासाठी तसेच पाणीयोजनेसाठी प्रचंड काम केले. सावर्डेतील धरणासाठीसुद्धा त्यांनी ९० कोटी रुपये मंजूर केले होते. समाजातील सर्व घटकासाठी दादा काम करत होते त्याचबरोबर ते कार्यकर्त्यांचीसुद्धा वैयक्तिक काळजी घेत होते. अजित पवार यांच्या काम करण्याच्या पद्धतीविषयी व स्वभावाचे अनेक पैलू उलगडले.

या शोकसभेस जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तानाजी चोरगे, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे प्रकाश देशपांडे, विजय गुजर, मिलिंद कापडी, जयद्रंथ खताते, नितीन ठसाळे, राजू महाडिक, विष्णुपंत सावर्डेकर आदी उपस्थित होते. तानाजी चोरगे म्हणाले, माझ्या हयातीमध्ये अनेक मंत्री झाले; पण अजितदादांसारखे काम करण्याची पद्धत मी पाहिली नाही. ज्या वेळी त्यांना भेटण्याचा योग येत असे त्या वेळी ते आवर्जून बँकेच्या संबंधित माझ्याकडे चौकशी करत असत. त्यांच्या विचारावर वाटचाल करत राहणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. ते लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयामध्ये आले त्या वेळी मला खूप उशिरा बोलावले, असे त्यांनी खंत बोलून दाखवली. वाचनालयाला येणाऱ्या समस्या त्यांनी मुख्याधिकारी यांना सांगून त्या तातडीने सोडवण्याचे आदेश दिले. जागच्या जागी निर्णय घेणारा नेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील, असे प्रकाश देशपांडे म्हणाले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments