“एक महासागर – एक भविष्य” ही संकल्पना आपल्याला हेच सांगते की, मानवाचे भविष्य महासागरांवर अवलंबून आहे. जर आपण आज त्यांचे संवर्धन केले नाही तर उद्या त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. सागरांचा सन्मान, संरक्षण आणि संवर्धन केल्यासच आपण एक सुरक्षित, समृद्ध आणि शाश्वत भविष्य घडवू शकतो. महासागर सुरक्षित असेल तरच आपले भविष्य उज्ज्वलं असेल, असे प्रतिपादन आसमंतचे संस्थापक-संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी केले. आसमंत फाउंडेशनतर्फे सलग चौथ्या वर्षी सागर महोत्सव आयोजित केला आहे. त्यासंबंधी ते म्हणाले, प्लास्टिकचा वापर कमी करणे, सागरी प्रदूषण थांबवणे, शाश्वत मासेमारीला प्रोत्साहन देणे आणि सागरी जीवसृष्टीबद्दल जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. हेच काम आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन सागर महोत्सवाच्या माध्यमातून करत आहे. हा महोत्सब मनुष्याच्या भविष्याशी उपयुक्त आहे. सागर अनंत आहे. त्याची अथांग निळाई, सतत लाटांमध्ये बदलणारी गती आणि खोलवर दडलेले गूढ मानवाला नेहमीच आकर्षित करत आले आहे. सागर केवळ पाण्याचा विशाल साठा नसून, पृथ्वीवरील जीवनाचा आधारस्तंभ आहे.
पृथ्वीवरील सुमारे सत्तर टक्के भाग महासागरांनी व्यापलेला आहे, तो संपूर्ण जगाच्या हवामानावर आणि पर्यावरणावर प्रभाव टाकतो. महासागर पृथ्वीचे तापमान नियंत्रित ठेवण्याचे महत्त्वाचे काम करते. सूर्याची उष्णता शोषून घेऊन ती हळूहळू वातावरणात सोडल्यामुळे हवामान संतुलित राहते. पर्जन्यचक्र, वारे, मान्सूनसारख्या नैसर्गिक प्रक्रिया महासागरांशी थेट जोडलेल्या आहेत. त्यामुळे महासागरांचे अस्तित्व सुरक्षित असेल तरच पृथ्वीवरील जीवन टिकून राहू शकते. आज महासागर अनेक संकटांना सामोरा जात आहे. प्लास्टिक प्रदूषण, रासायनिक कचरा, तेलगळती, अतिमासेमारी आणि हवामान बदलामुळे सागरी परिसंस्था धोक्यात आली आहे. प्रवाळ भित्ती नष्ट होत आहेत, अनेक जलचर प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. हे चित्र भविष्यासाठी अत्यंत चिंताजनक आहे, असे त्यांनी सांगितले.
जैवविविधतेचा खजिना – महासागर जैवविविधतेचा खजिनाच आहे. असंख्य मासे, जलचर, प्रवाळ भित्ती आणि सूक्ष्मजीव यांचं घर आहे सागर. या सजीवांवर लाखो लोकांची उपजीविका अवलंबून आहे. मासेमारी, खनिजं, वाहतूक, पर्यटन आणि सागरी उद्योग यांमधून अनेक देशांची अर्थव्यवस्था चालते. त्यामुळे सागरांचं संरक्षण म्हणजे केवळ निसर्गसंवर्धन नव्हे, तर सामाजिक आणि आर्थिक सुरक्षितताही आहे.
