कमी गर्दीच्या हंगामात एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या १५१ कि. मी. पेक्षा जास्त प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत देण्यास १ जुलैपासून सुरुवात झाली होती; मात्र ही योजना तीन ते चार महिनेच टिकली. त्यानंतर महामंडळाच्या वतीने दिवाळीत हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, निर्णयास विरोध झाल्यानंतर तूर्तास भाडेवाढ मागे घेतली आणि १५ टक्के सवलत थांबवण्यात आली आहे. जिल्ह्यास राज्यभरात या योजनेस ब्रेक लागला आहे. कमी गर्दीच्या हंगामात एसटीला प्रवाशांचा प्रतिसाद वाढावा म्हणून एसटीच्या वर्धापन दिनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी लांब पल्ल्याच्या अंतराचा प्रवास केल्यास १५ टक्के सवलत जाहीर केली व १ जुलैपासून अंमलबजावणी झाली. ज्येष्ठ नागरिक, महिलांनंतर आता पुरुषांना १५ टक्के सवलत देण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यभरातील प्रवाशांनी १५१ कि.मी. पेक्षा जास्त प्रवास केल्यास ही सवलत लागू होती. आषाढी, गणपती उत्सवात कोकणकरांनी या योजनेचा लाभ घेतला होता. गर्दीचा हंगाम वगळता १५ टक्के सवलतीचा चांगला फायदा प्रवाशांना झाला होता. प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. दिवाळीत हंगामी भाडेवाढचा निर्णय न झाल्यामुळे महामंडळाकडून ही सवलत योजना थांबवली आहे.
त्यामुळे ज्यांना सवलत नव्हती अशा पुरुष प्रवाशांसाठी ही योजना चांगली होती. पुन्हा ही योजना सुरू करा, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. रत्नागिरी आगाराच्या अधिकाऱ्यांना विचारल्यास एसटीकडूनच ही योजना थांबवण्यात आल्याचे सांगण्यात आले. एसटी विभागाच्या वतीने पुरुषांना तिकिटात १५ टक्के सवलत दिली होती. ही योजना छान होती. लांब पल्ल्याच्या अंतराचा प्रवास केल्यास तिकिटांचा खर्च जास्त होत होता. त्यामुळे बचतही होत होती. काहीच महिने ही सवलत सुरू ठेवली. आम्ही वारंवार बुकिंग करताना विचारणा केली असता एसटी विभागाकडूनच बंद केली, असे सांगण्यात आले. एसटी महामंडळाने ही सवलत योजना पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
