मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील निवळी घाट व हातखंबा परिसरात वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या ठिकाणी महामार्गाच्या चुकीच्या आराखड्यामुळे अपघातांचा धोका आणखीनच वाढणार आहे. हे लक्षात घेऊन या महामार्गाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून आराखड्यात बदल करावा, अशी मागणी भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा निवळी उपसरपंच संजय निवळकर यांनी निवदेनाद्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. निवळी येथील तारवेवाडी सेवारस्ता हातखंबा बोंबलेवाडीपर्यंत वाढवण्यात आला तर त्याचा आजुबाजूच्या गावांना फायदा होईल तसेच रहदारीसाठी मुख्य रस्त्यावर यावे लागणार नाही आणि सुरक्षित ये-जा करणे शक्य होईल. या सेवारस्त्याची अंदाजे लांबी १.६ किलोमीटरइतकी आहे. निवळी येथील सुरू असलेल्या उड्डाणपुलामुळे जयगडवरून येणारी अवजड वाहनांची वाहतूक ही म्हणजेच उड्डाणपुलाखालून बाजारपेठेतून होणार असल्याने कायमस्वरूपी अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे ही बाजारपेठ तिथून बाजूला केली तर अनकेजण व्यवसायापासून वंचित राहतील.
छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना उड्डाणपुलामुळे अतोनात नुकसान होणार आहे. त्यामुळे उड्डाणपुलाऐवजी फ्लॅट जंक्शन महामार्ग करावा. निवळी-जयगड रोड येथे मोठे जंक्शन करून निवळी बाजारपेठेत मिनी जंक्शन करावे. निवळी येथून बोंबलेवाडीपर्यंत सेवारस्ता सुमारे १.६ किमी लांबीचा करावा. निवळी-रावणंगवाडी येथून रावणंगवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याला ये-जा करण्यासाठी बोगदा ठेवावा. निवळी बँक ऑफ इंडियासमोर मोठी अवजड वाहनांची ये-जा होईल एवढा मार्ग खुला ठेवावा जेणेकरून स्थानिकांना त्याचा फायदा होईल. सद्यःस्थितीत निवळी-जयगड रस्ता राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या जंक्शनवर उड्डाणपूल आहे. हा उड्डाणपूल निवळीच्या मुख्य बाजारपेठेतून जातो. त्यामुळे तेथील बाजारपेठेतील व्यावसायिकांना आर्थिक फटका बसणार आहे. या ठिकाणी पूल झाला तर येथील बाजारपेठ पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. याचा विचार करून निवळी व हातखंबा येथील महामार्गाच्या आराखड्याबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी निवदेनाद्वारे केली आहे.
एक वर्षात २१ अपघात – २०२४-२५ या अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत निवळी घाट व हातखंबा परिसरात सुमारे २१ प्राणांतिक अपघात झाले असून, त्यामध्ये ७जणांचा मृत्यू तर ६७ जण गंभीर जखमी झाले आहेत. निवळी घाटात सुमारे तीन किलोमीटरचा सलग उतार आणि तीव्र वळणांचा रस्ता असल्याने अवजड वाहनांवरील चालकांचे नियंत्रण सुटते. वेगावर मर्यादा न राहिल्याने ब्रेक निकामी होऊन अपघात घडत असल्याचे गंभीर चित्र आहे. या अपघातांमध्ये अनेक स्थानिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
