चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकाच्या हायटेक बसस्थानकाचे काम एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती ठेकेदार तेजस शिंदे यांनी दिली. शुक्रवारी (ता. २) सायंकाळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी येथील कामाची पाहणी केली. या वेळी झालेल्या चर्चेत ठेकेदार शिंदे यांनी सांगितले, या प्रकल्पाचे मूळ अंदाजपत्रक २०१६ ला तयार करण्यात आले होते; मात्र कोरोना काळात निधीत कपात झाल्याने सुरुवातीला ५.८५ कोटी रुपयांना मंजुरी असलेले काम आता २.८७ कोटी रुपयांमध्ये पूर्ण केले जात आहे. सध्या काम वेगाने सुरू असून, एप्रिल-मे अखेर हे काम पूर्ण करून हायटेक बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात येईल.
नगराध्यक्षांनी शौचालय अंतर्गत भागात घेण्यात आल्याबाबत नाराजी व्यक्त केली. पाहणीदरम्यान नगराध्यक्षांनी कामाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या तसेच शासन आणि नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही दिली. या प्रसंगी आगारप्रमुख दीपक चव्हाण, स्वप्नील भोसले, स्वरूप माने, गौरव उदक, नगरसेवक निहार कोवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रवाशांना मिळणार दिलासा – चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकाच्या हायटेक बसस्थानकाचे काम एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या हायटेक बसस्थानकामुळे प्रवाशांना आवश्यक त्या सुविधा व प्रसन्न वाता-वरण उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे, याकडे त्यांचे डोळे लागून राहिले आहेत.
परिवहनमंत्र्यांसह करणार पाहणी – १५ जानेवारीनंतर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना पाहणीसाठी बोलाव-ण्यात येणार आहे. त्या वेळी पहिल्या मजल्यावर अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांच्याकडे करण्यात येईल, असे नगराध्यक्ष सकपाळ यांनी सांगितले.
