वाढते पेट्रोल-डिझेल दर, पर्यावरणाबाबत वाढती जागरूकता आणि शासकीय सवलती यांचा परिणाम म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात इलेक्ट्रीक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत आहे. पारंपारिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांना पर्याय म्हणून आता ई वाहने रत्नागिरीकरांची पहिली पसंती ठरत आहे. दि. १ जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यात १५०० हून अधिक इलेक्ट्रीक वाहनांची नोंदणी झाली असून, ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढ दर्शवते. मागील काही वर्षात पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर मोठा ताण पडत आहे. दरमहा इंधनावर होणारा खर्च टाळण्यासाठी तसेच देखभाल खर्च कमी असल्याने नागरिक इलेक्ट्रीक वाहनांकडे वळताना दिसत आहेत. एका चार्ज केल्यावर कमी खर्चात जास्त अंतर कापण्याची क्षमता असल्यामुळे ई वाहने आर्थिकदृष्ट्या परवडणारी ठरत आहेत.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील माहितीनुसार जिल्ह्यात नोंद झालेल्या इलेक्टीक वाहनांमध्ये दुचाकीचे प्रमाण सर्वाधिक आहे. शहरांमध्ये दैनंदिन प्रवास, कार्यालयीन वापर तसेच विद्यार्थ्यांमध्ये इलेक्ट्रीक दुचाकी लोकप्रिय ठरत आहेत. याशिवाय चारचाकी रिक्षा, मालवाहू व हायब्रीड वाहनांच्या नोंदणीतही वाढ झाल्याचे दिसून येते. राज्य शासनाच्या २०२५-२०३० इलेक्ट्रीक वाहन धोरणांमुळे ई-वाहन खरेदीस मोठे प्रोत्साहन मिळाले आहे. वाहन नोंदणीवर १० ते १५ टक्क्यांपर्यंत सवलत, चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी ५ ते १० लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत, सार्वजनिक तसेच खाजगी पातळीवर चार्जिंग पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर, यामुळे ई-वाहनांकडे वळण्याचा निर्णय नागरिकांसाठी अधिक सोपा झाला
