कोरोनाच्या संकटापासून मध्य रेल्वेने बंद केलेली कोकणवासियांच्या हक्काची दादर-रत्नागिरी पैसेंजर पूर्ववत करून कोकणवासियांना दिलासा द्यावा, अशा मागणीचे निवेदन अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. या मागणीचा गांभिर्याने विचार करावा, असे साकडेही घालण्यात आले आहे. कोरोनाच्या नावाखाली क्षमता नसल्याचे आणि वक्तशीरपणाचे कारण देत दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली. नवीन शून्य आधारित वेळापत्रकात दिवा-रत्नागिरी पॅसेंजर करण्यात आली. मात्र, आज घडीलाही रत्नागिरी पॅसेंजरच्या वक्तशीरपणात काहीही बदल झालेला नाही.
दादरहून येत असताना तेथेच गाठीत पाणी भरले जात असल्यामुळे ही गाडी पनवेलहून थेट निघू शकत होती. मात्र, आता दिव्यात तशी सोय नसल्यामुळे दोन्ही वेळेस पनवेलला १० ते २० मिनिटे वाया जातात. यामुळे मागील गाड्या पुढे काढाव्या लागत असल्याने आणखी अर्धा तास वाया जावून गाडीला उशीर होतो. १०१०५/१०१०६ क्रमांकाची सावंतवाडी-दिवा व ५०१०३/५०१०४ रत्नागिरी-दिवा या गाड्यांना कायमच प्रवाशांची गर्दी असली तरी दिवा येथील फलाट कमी लांबीचे असल्याने या गाड्यांना १० पेक्षा अधिक डबे लावता येत नाही.
