HomeRatnagiriमोहोराचा बहर; पण फळधारणेत घट हापूसची स्थिती

मोहोराचा बहर; पण फळधारणेत घट हापूसची स्थिती

१० रोजी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

पाऊस लांबल्यामुळे थंडी पडण्यास उशीर झाला; मात्र डिसेंबर महिन्यात किमान तापमानाचा कालावधी अधिक राहिल्यामुळे हापूस कलमांना दहापट अधिक मोहोर आला होता; परंतु अपेक्षित फळधारणा न झाल्याने या टप्प्यातील उत्पादन अपेक्षित मिळेल की नाही, याबाबत बागायतदारांमधूनच शंका उपस्थितीत होत आहे. ७० टक्क्यांहून अधिक मोहोर वांझ (फळधारणा न झालेला) निघाल्याचे बागायतदारांचे मत आहे तसेच दोन दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे मोहोरावर अळी, तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढलेला असून, मोहोर काळा पडत आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस किमान पारा २१ अंशावर आला होता. त्यामुळे थंडीचा जोर ओसरू लागला. दिवसाही उष्मा जाणवू लागलेला होता. मागील आठ दिवसात हे वातावरण होते; परंतु गेल्या दोन दिवसात पुन्हा थंडीचा जोर वाढू लागलेला आहे. दापोली कोकण कृषी विद्यापीठामध्ये झालेल्या नोंदीनुसार पारा पुन्हा ९ अंशापर्यंत खाली आलेला आहे. यंदा दापोलीत किमान पाऱ्याची नोंद सर्वाधिक कालावधीसाठी राहिलेली आहे.

कोकणात जानेवारी महिन्यात अधिक थंडी जाणवते. यावर्षी एक महिना आधीच थंडीचा कडाका होता. त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावरही झालेला होता. ग्रामीण भागात शेकोट्या ठिकठिकाणी पेटलेल्या पाहायला मिळत होत्या. तसेच थंडीमुळे सर्दी-खोकल्यासारख्या आरोग्यविषयक तक्रारीही वाढता आहेत. वाढलेल्या थंडीचा परिणाम हापूसच्या उत्पादनावर होत आहे. पाऊस लांबल्यामुळे यंदा हंगाम एक महिना विलंबाने सुरू होणार आहे. यावर्षी हापूसला प्रचंड मोहोर आलेला असला तरीही, सेटिंग कमी होताना दिसत आहे. हा अतिथंडीचा परिणाम असल्याचे बागायतदारांचे मत आहे. ७५ टक्के मोहोर वांझ असून, अवघ्या १५ ते २० टक्के मोहोराचे सेटिंग होत आहे. त्यातून उत्पादन किती मिळेल, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. संक्रांतीच्या दरम्यान येणाऱ्या मोहोरावर मे महिन्यातील उत्पादनाचे गणित अवंलबून राहील. तसेच गेले दोन दिवस किनारपट्टीवर ढगाळ वातावरण राहिल्यामुळे मोहोरावर अळी, तुडतुडा पडलेला आहे. सकाळी धुके पडल्यामुळे करप्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. मोहोर काळा पडला असून, त्यामधून उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे.

असा आहे हवामानाचा अंदाज – प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार, रत्नागिरी जिल्ह्यात ११ जानेवारीपर्यंत कमाल तापमान ३२ व ३३ अंश सेल्सिअसदरम्यान तर किमान तापमान १८ ते २० अंश सेल्सिअमदरम्यान राहण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांमध्ये सकाळची सापेक्ष आर्द्रता ५६-६८ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४८-५२ टक्के या दरम्यान अस-ण्याची शक्यता आहे. या कालावधीत वाऱ्याचा वेग ६.६-८.० किलोमीटरदरम्यान राहण्याची शक्यता आहे. १० रोजी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments