उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी, चिपळूणमध्ये

जलतरण तलाव येथे ही जाहीर सभा होणार आहे.

Must read

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता. ३) रत्नागिरी आणि चिपळूण येथे जाहीर सभा होणार आहे. रत्नागिरी हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने ग्रामीण भागाच्या निवडणुकीसाठी शहरात ही जाहीर सभा होणार आहे. शिवसेना रत्नागिरी तालुकाप्रमुख बाबू म्हाप, चिपळूण शहरप्रमुख तथा नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी ही माहिती दिली. रत्नागिरी शहरातील जलतरण तलाव येथे ही जाहीर सभा होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली याचे नियोजन झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील दहा गट आणि २० पंचायत समितीच्या गणासाठी ही सभा होणार आहे. दुपारी दोन वाजता होणाऱ्या सभेसाठी भलामोठा पेंडॉल घालण्यात आला आहे. चिपळूण येथे उपमुख्यमंत्र्यांची पहिली सभा होणार आहे.

माजी आमदार सदानंद चव्हाण आणि भाजप नेते प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रचार सभेचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी (ता. ७) मतदान होणार असून, ९ ला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर युतीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. महायुतीची ही प्रचार सभा इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे सकाळी १० वा. होणार आहे. या सभेला शिवसेना व भाजपचे जिल्हाप्रमुख, प्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, सर्व पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते तसेच महायुतीचे सर्व उमेदवार, महायुतीचे सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचेही सकपाळ यांनी सांगितले.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article