थंडीची चाहूल लागताच मिनी महाबळेश्वर दापोली तालुक्यात निसर्गाने पुन्हा एकदा आपले अद्भुत सौंदर्य उधळून दिले आहे. निळ्याशार समुद्राच्या लाटांवर उड्या मारत संचार करणाऱ्या डॉल्फिन माशांनी आंजर्ले किनारपट्टीवर हजेरी लावल्याने दापोली पर्यटनाला नवे आकर्षण मिळाले आहे. डिसेंबरच्या सुरुवातीलाच किमान १० फुटी डॉल्फिन पर्यटकांनी पहिल्यांदाच पाहिल्याने पर्यटकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, दापोलीची किनारपट्टी सध्या ‘डॉल्फिन हॉटस्पॉट’ ठरत आहे. डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात दापोली तालुक्यात किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरल्याने डॉल्फिनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुरुड, हर्णे, लाडघर आणि आंजर्ले या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात डॉल्फिन दिसून येत आहेत. यामध्ये सर्रास किमान ८ ते १० फुटांचे डॉल्फिन वारंवार दर्शन देत असल्याने हा परिसर पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. कोकण किनारपट्टी डॉल्फिनसाठी नैसर्गिकदृष्ट्या पोषक मानली जाते. येथे विविध प्रकारचे मासे व सागरी जीव मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने डॉल्फिनसाठी हा भाग आदर्श अन्नस्त्रोत ठरतो.
किनाऱ्यालगतचा उथळ, चिखलयुक्त समुद्रतळ डॉल्फिनच्या संचारासाठी सोयीचा असल्याचे तज्ज्ञ सांगतात. जिज्ञासू व खेळकर स्वभावामुळे डॉल्फिन बोटींच्या आसपास उड्या मारताना, आवाज करताना दिसतात आणि त्यामुळे पर्यटकांना त्यांचे दर्शन अगदी जवळून घडते. कोकण किनारपट्टीवर हम्पबॅक व बॉटलनोज डॉल्फिन या प्रजाती नियमितपणे आढळतात. सध्या आंजर्ले किनाऱ्यावर डॉल्फिन दर्शनासाठी सहा फायबर नौका कार्यरत असून, देश-विदेशातून येणारा बहुतांश पर्यटक डॉल्फिन सफर केल्याशिवाय दापोली सोडत नाही. साधारणतः ८ ते १० फूट लांबीचे डॉल्फिन येथे नेहमी दिसतात; मात्र अलीकडेच सुमारे १० फूट लांबीच्या मोठ्या डॉल्फिनचे दर्शन झाल्याने प्रथमच आलेल्या पर्यटकांना विशेष आनंद व आश्चर्य वाटले. बोटीतूनच या दृश्याचे छायाचित्रण व चित्रीकरण करण्यात आले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. निसर्गाच्या या भेटीमुळे दापोलीचे पर्यटन वैभव उजळून निघाले.
