HomeRatnagiriराष्ट्रवादीसाठी महायुतीचे दरवाजे खुले सत्तेसाठी 'यू-टर्न'

राष्ट्रवादीसाठी महायुतीचे दरवाजे खुले सत्तेसाठी ‘यू-टर्न’

राष्ट्रवादीला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले होते.

राष्ट्रवादी काँग्रेससाठी (अजित पवार गट) महायुतीचे दरवाजे कायमचे बंद असल्याची घोषणा नगरपालिका निवडणुकीवेळी करणाऱ्या भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीवर आता पुन्हा त्याच राष्ट्रवादीचा हात धरण्याची वेळ आली आहे. चिपळूण पंचायत समितीच्या सत्तेची गणिते जुळविण्यासाठी महायुतीतील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. मांडकी-पालवण येथील कार्यक्रमावेळी महायुती पुन्हा दिसेल, असे वक्तव्य पालकमंत्री उदय सामंत यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्वांना उधाण आले आहे. नगरपालिका निवडणुकीत महायुतीतून राष्ट्रवादीला ऐनवेळी बाजूला सारले गेले होते. त्यावेळी आमदार शेखर निकम यांची मोठी तारांबळ उडाली होती. राष्ट्रवादीला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. या विजयानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही राष्ट्रवादीला दूर ठेवण्याची घोषणा केली. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालाने चित्र पालटले आहे.

पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) गटाला सात जागा मिळाल्या असून, सर्वांत मोठा पक्ष म्हणून नोंद झाली आहे. शिवसेना (शिंदे गट) व भाजप युतीला सात जागा आणि ठाकरे शिवसेनेला चार जागा मिळाल्या आहेत. कोणत्याही एका गटाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे सत्ता स्थापनेत पेच निर्माण झाला आहे. सुरुवातीला राष्ट्रवादी आणि ठाकरे गट एकत्र येतील अशी चर्चा होती. आमदार शेखर निकम यांनी तसे सुतोवाच केले होते. मात्र, ठाकरे शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महायुतीने पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. ‘ज्यांच्याशी संघर्ष केला, त्यांच्याशीच हातमिळवणी’ अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. मांडकी पालवण येथील साहित्य संमेलनादरम्यान पालकमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याचे दिलेले संकेत याच राजकीय अपरिहार्यतेचा भाग मानला जात आहे.

कार्यकर्ते संभ्रमात – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणत सर्वच पक्षांच्या प्रमुखांच्या भावना कार्यकर्त्यांप्रती उफाळून आल्या होत्या. कुठेही तडजोड न करता कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या भावनेने कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले गेले होते. कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी कार्यकर्त्यांनाच निवडणुकीच्या मैदानात उतरवणाऱ्या महायुतीतील घटक पक्ष आता सत्तेसाठी एकत्र येण्याची शक्यता आहे. आता सत्तेची गणिते कशी बांधली जातात, याकडेच साऱ्यांचे लक्ष असल्याचे दिसत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments