महानगरांनाही एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य : मंत्री उदय सामंत

शिवसेनेचे सुमारे सव्वाचारशेहून अधिक नगरसेवक निवडून आले आहेत.

Must read

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी केल्यामुळेच जनतेने उद्धव ठाकरे शिवसेनेला नाकारले. मुंबईत मराठी अस्मितेचा आव आणणाऱ्यांना मुंबईकरांनी विकासाच्या मुद्द्यावर उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विकासकामांना जनतेने कौल दिला आहे. राज्यात दुसऱ्या क्रमांकाची मते देऊन शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मोठ्या शहरांनीही मान्य केले आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे उपनेते आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. रत्नागिरीतील शहरातील बंगल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उदय सामंत म्हणाले, ‘संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचे सुमारे सव्वाचारशेहून अधिक नगरसेवक निवडून आले आहेत. पहिल्यांदाच मुंबईत शून्यावरून थेट २९ जागा जिंकणे, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीवर पूर्ण वर्चस्व मिळवणे हा शिंदेंच्या लोकप्रियतेचा विजय आहे. विशेषतः ज्या शहरांमध्ये पक्षाचे अस्तित्व नव्हते अशा चिंचवडमध्ये पिंपरी-सहा तर नागपूर, चंद्रपूर आणि अकोलासारख्या शहरांतही पक्षाचे नगरसेवक स्वबळावर निवडून आले आहेत.

नवी मुंबईत पक्षाने ४०चा आकडा पार केला असून, सांगली-मिरज-कुपवाडमध्ये तर महापौर ठरवण्याची ताकद शिवसेनेने निर्माण केली. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी केली त्यामुळेच जनतेने मुंबईत ठाकरेंना नाकारले. छत्रपती संभाजीनगरचे नामकरण करण्याला विरोध करणाऱ्यांना तिकीट देऊन उबाठाने आपली दुटप्पी भूमिका स्पष्ट केल्याचा आरोपही त्यांनी केला. ज्या ठिकाणी पक्षाचे उमेदवार कमी पडले तिथे आत्मपरीक्षण करून संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत केली जाईल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. शेवटी, हा विजय म्हणजे महाराष्ट्रातील महानगरांनी शिंदेच्या नेतृत्वाला दिलेला मोठा कौल आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जनतेचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो, असे सामंत म्हणाले.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article