पावस गटात दोन शिवसेनेमध्येच लढत

या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Must read

स्व. कुसुमताई अभ्यंकर यांच्या आमदारपदाच्या कारकिर्दीपासून भाजपचा बालेकिल्ला असलेला पावस जिल्हा परिषद गटामध्ये महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी न मिळाल्यामुळे या गटांमध्ये ठाकरे शिवसेना विरुद्ध शिंदे शिवसेना अशी रंगतदार लढत होणार आहे. या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते शेवटपर्यंत कोणाच्या बाजूने राहणार, यावर सर्व गणिते अवलंबून राहणार आहेत. पावस जिल्हा परिषद गट पारंपरिक भाजपचा बालेकिल्ला आहे, हे त्यांच्या कार्यकत्यांनी सातत्याने दाखवून दिले आहे. त्यानंतर शिवसेनेची युती झाल्यानंतर हा बालेकिल्ला आणखी मजबूत झाला; परंतु स्थानिक पातळीवर मतभेद असल्याने कालांतराने दोन्ही पक्षांमध्ये कागदोपत्री युती होती. त्या वेळी भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले; परंतु त्यानंतर आमदार उदय सामंत यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात वाढले. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ठाकरे गट व शिंदेगट असे शिवसेनेचे विभाजन झाले. यामध्ये अनेकांनी शिंदेगटामध्ये प्रवेश केल्यामुळे शिंदेगटाचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे या जिल्हा परिषद गटातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये शिंदेगटाने आपले प्राबल्य मिळवले. यामध्ये भाजपची काही प्रमाणात घसरण झाली; मात्र पक्षाने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती झाल्यामुळे शिंदेगट व भाजप यांनी आपल्यातील अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून पक्षाचे काम केल्यामुळे दोन्ही निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार विजयी झाला. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता मिळवण्याच्या दृष्टिकोनातून वरिष्ठ पातळीवरून महायुती झाल्यामुळे जिल्ह्यामध्ये महायुतीचे वाटप झाले; मात्र रत्नागिरी तालुक्यामध्ये बालेकिल्ला असलेल्या पावसमध्ये भाजपला उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रचंड नाराजी निर्माण झाली होती; परंतु वरिष्ठ पातळीवरून समजूत घातल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी शिंदेगटाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आणि मतभेद बाजूला ठेवून प्रचाराला सुरुवात केली. भविष्यातील या गटातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती करण्यात आली असून, प्रचारयंत्रणा राबवली जात आहे. विकासकामांवर ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जात आहे. पावस गटात महायुतीचे अॅड. महेंद्र मांडवकर हे उमेदवार आहेत. ठाकरे गटाचे पावस विभागप्रमुख रवीकिरण तोडणकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचार सुरू आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article