चिपळूणच्या वाशिष्ठी खाडीत मोठ्या संख्येने स्थलांतरित फ्लेमिंगोचे आगमन झाले आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षणासाठी निरीक्षकांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतरित पक्षी वाशिष्ठीच्या किनाऱ्यावर गुलाबी रंग भरतात. चिपळूण तालुक्याला मोठा खाडीकिनारा लाभला आहे. मालदोली, गांग्रई, भिले, कालुस्ते आदी गावातील खाडीकिनारी स्थलांतरित फ्लेमिंगोचे आगमन झाले आहे. उन्हाळ्यापर्यंत त्यांचा विसावा या ठिकाणी असतो. या काळात त्यांचे अनेक सुंदर दृश्य सोशल मीडियावर शेअर केले जातात. हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी अनेक पक्षी निरीक्षक या भागात येतात आणि फ्लेमिंगो आणि सीगलचे हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करतात. वाशिष्ठी खाडीला भरती असते तेव्हा हे पक्षी झाडावर तसेच आजूबाजूच्या शेतामध्ये खाद्य शोधताना वावरतात. ओहोटी सुरू झाल्यानंतर हे पक्षी खाडीकिनारी असलेल्या दलदलीमध्ये खाद्य शोधतात. पक्ष्यांचे हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. ते सहसा नोव्हेंबरमध्ये येतात; परंतु यावर्षी त्यांचे आगमन उशिरा झाले आहे.
स्थानिकांकडून होमस्टेची व्यवस्था – चिपळूण तालुक्यातील खाडीकिनारी असलेल्या अनेक गावांमध्ये स्थानिकांकडून होमस्टेची व्यवस्था केली आहे. तसेच खाडीमध्ये फिरण्यासाठी स्थानिकांनी बोटीची व्यवस्था केली आहे. खाडीच्या एका बाजूला चिपळूण आणि दुसऱ्या बाजूला खेड तालुक्याची हद्द सुरू होते. दोन्ही बाजूने पक्षी निरीक्षण करण्याची व्यवस्था आहे. बाहेरून येणारे पक्षी निरीक्षक या ठिकाणी थांबतात. भरती-ओहोटीची वेळ बघून ते निरीक्षणासाठी खाडीवर जातात. त्यामुळे स्थानिक लोकांनाही रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
