केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्ग एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दिली; मात्र संगमेश्वर, चिपळूण, पाली येथील उड्डाणपुलाच्या कामाची गती पाहता हे पूल पुढील सहा महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे या वेळचे आश्वासनही खोटे ठरण्याची शक्यता दिसत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असले तरी पुलांची कामे रेंगाळली आहेत. आरवली ते लांजादरम्यानचे काम अजूनही मुंगीच्या वेगाने सुरू आहे. चौपदरीकरण करताना जागोजागी वळवलेले रस्ते, मोठ्या पुलांच्या ठिकाणी असलेली घोकादायक स्थिती ‘जैसे थे’ असल्यामुळे ही कामे जीवघेणी बनली आहेत. ज्या ठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण झाले तिथेही अजून डायव्हर्जन आहेत; मात्र त्या ठिकाणी दिशादर्शक फलक नाही. त्यामुळे वाहनांचे अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वी कापसाळ येथील ट्रॅव्हल्सला अपघात झाला. त्यात चालकाला मोठी दुखापत झाली. असे अपघात येथे वारंवार घडत आहेत; मात्र अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना शून्य आहेत. त्यामुळे कामाची एकूण गती पाहता पुढील सहा महिन्यात हे काम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे.
चिपळूणमध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. ते पुढील सहा महिन्यात पूर्ण होणे शक्य नाही. चिपळूण शहरातील सेवारस्त्यांवर अपघात टाळण्यासाठीच्या उपाययोजना झालेल्या नाहीत. रस्त्याला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. तेथील रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. चिपळूणपासून पुढे हातखंबापर्यंत पुलांची कामे झाली आहेत. काही ठिकाणी अंडरपासही तयार करण्यात आले आहेत. पावसाळ्यात या अंडरपासवर पाणी साचते. आता पावसाळा संपला आहे. त्यामुळे अशा ठिकाणी उपाययोजना करण्याची गरज आहे. संगमेश्वर येथील उड्डाणपुलावर गर्डर चढवण्याचे काम सुरू आहे. हे काम जरी पूर्ण झाले तरी या पुलावर जाण्यासाठीचा रस्ता करेपर्यंत सहा महिन्यांचा कालावधी पुरणार नाही, अशी सद्यःस्थिती आहे. कारण, या पुलावर चढण्यासाठी लागणारा दोन्ही बाजूने भराव अजून करण्यात आलेला नाही. पाली येथील पुलावरील गर्डर चढवण्याचे काम सुरू झालेले नाही.
