तालुक्यात पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. आंचल मदन सकपाळ (वय १३, रा. कल्याण, जि. ठाणे) असे मृत मुलीचे नाव आहे. आंचलचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार, मृत्यूचे कारण फूड पॉयझनिंग असावे, असे सांगण्यात या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात शनिवारी उशिरापर्यंत नोंद करण्याची कार्यवाही सुरू असून, अधिक तपास दापोली पोलिस करत आहेत. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू होती. सविस्तर माहिती अशी, मुंबई-कल्याण परिसरातून सकपाळ कुटुंब २५ डिसेंबर रोजी दापोली येथे पर्यटनासाठी आले होते. आंजर्ले परिसरातील एका रिसॉर्टमध्ये हे कुटुंब मुक्कामी होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून कुटुंबीय दापोली परिसरातील विविध पर्यटनस्थळांचा आनंद घेत होते. शनिवारी सकाळी परतीच्या प्रवासासाठी निघायचे असल्याने कुटुंबीयांनी आंचल हिला उठवण्याचा प्रयत्न केला असता ती प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आले. तिचे शरीर थंड पडलेले असून, दातखिळी बसल्याचेही आढळून आले.
घाबरलेल्या कुटुंबीयांनी स्थानिकांच्या मदतीने तत्काळ आंचलला आंजर्ले येथील जवळच्या रुग्णालयात दाखल केले; मात्र तेथून तिला तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती आंचल हिला मृत घोषित केले. आंचल ही ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील सेंट थॉमस विद्यालयात आठवीत शिक्षण घेत होती. शुक्रवारी रात्री जेवणानंतर तिने काही वेळ खेळ केला आणि त्यानंतर झोपायला गेली; मात्र ती पुन्हा उठलीच नाही. आंचल ही सकपाळ कुटुंबाची एकुलती एक लाडकी मुलगी होती. तिच्या अकाली मृत्यूने कुटुंबीय व नातेवाइकांवर मोठा आघात झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच दापोलीच्या नगराध्यक्ष कृपा घाग, नगरसेविका प्रीती शिर्के, नगरपंचायत अभियंता सुनील सावके, निवृत्त शिक्षक रमाकांत शिगवण यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दापोली उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच, दापोली पोलिस निरीक्षक महेश तोरस्कर व सहाय्यक पोलिस निरीक्षक यादव यांनीही रुग्णालयात भेट देऊन माहिती घेतली.
