शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून, वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत आहेत. या प्रार्श्वभूमीवर दापोली नगरपंचायत प्रशासनाने शहर अतिक्रमणमुक्त करण्याचा ठोस निर्णय घेतला आहे. पदपथ, रस्त्याच्या कडेला, गटारांवर तसेच फूटपाथवर करण्यात आलेली सर्व अतिक्रमणे हटवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात नगरपंचायतीने वृत्तपत्रातून जाहीर सूचना प्रसिद्ध करत स्वयंस्फूर्तपणे अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले आहे; अन्यथा त्यानंतर कोणत्याही क्षणी अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात येईल व त्यातून होणाऱ्या नुकसानीस नगरपंचायत जबाबदार राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शहरात विशेषतः २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत अतिक्रमणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. दापोली हे पर्यटनस्थळ असल्याने या अतिक्रमणांमुळे शहराच्या सौंदर्यावर परिणाम होत असून, वाहतुकीचा खोळंबा आणि पादचाऱ्यांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी नगरपंचायतीकडे प्राप्त झाल्या आहेत.
नगरपंचायत हद्दीतील रस्ते, गटारे व फूटपाथवरील अतिक्रमण नोटीस न देता हटवण्याचा अधिकार प्रशासनाला असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. स्थगिती आदेश मिळवलेल्या खोकेधारकांनीही फूटपाथवरील वाढीव बांधकामे अथवा दुकानांसमोरील छप्पर तत्काळ काढून टाकावीत, असा इशाराही देण्यात आला आहे. नोटिसा देऊनसुद्धा अतिक्रमण कायम राहिल्यास २० तारखेला बुरोंडीनाक्यापासून एसटी स्टँडपर्यंतची अतिक्रमणे पोलिस संरक्षणात हटवण्यात येणार असल्याचे नगरपंचायत प्रशासनाने सांगितले.
अपेक्षा दापोलीकरांच्या – मटण व चिकन शॉपसाठीचे पर्यायी ठिकाणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, ते पूर्ण झाल्यानंतर संबंधित दुकानदारांना तेथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यानंतर दाभोळ रोडवरील अतिक्रमणही लवकरच हटवले जाणार आहेत. अतिक्रमण हटवल्यास पादचाऱ्यांना मोकळा व सुरक्षित मार्ग उपलब्ध होईल, अशी अपेक्षा दापोलीकर व्यक्त करत आहेत.
