लांबणीवर पडलेल्या पावसामुळे आंबा कलमांना आलेली पालवी जून (अधिक मजबूत) होत आहे. याच कालावधीत थंडी वाढत असून, काही भागांमध्ये हापूस कलमांना मोहोर येऊ लागला आहे. त्यामुळे आंबा बागायतदार सुखावले आहेत. पुढील काही दिवसांमध्ये वातावरण कसे राहील, याकडेही बागायदार लक्ष ठेवून आहेत. सध्या तुडतुडा आणि श्रीप्सचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बागांमध्ये सध्या कीटकनाशक औषधांची फवारणी करण्यावर जोर आहे. सध्याच्या वातावरणामुळे मोहोर येण्यास पूरक वातावरण आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असलेला आंबा हंगाम गतवर्षी सुरुवातीपासून प्रतिकूल हवामान आणि निसर्गसंकटाच्या दुष्टचक्रामध्ये सापडलेला होता. लांबणीवर पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याला मोहोर येण्यासाठी आवश्यक थंडी गतवर्षी उशिरा सुरू झाली होती. त्यामुळे आंबा हंगामालाही विलंब झाला होता. आंब्याला मोहोर येण्यापूर्वी पालवीला अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यातच, थ्रीप्स आणि किडीच्या झालेल्या प्रादुर्भावामुळे मोहोरापूर्वी आलेली पालवी धोक्यात आली होती.
बहुतांश कलमांना उशिरा मोहोर आल्याने त्याचा फटका आर्थिक उलाढालींना बसला होता. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पाऊस हंगाम लांबणीवर पडलेला होता. त्यातून, आंबा कलमांना चांगलीच पालवी फुटली होती. मागील महिन्यामध्ये पडलेल्या अवकाळी पावसाचा म्हणावा तितकासा पालवीवर प्रतिकूल परिणाम झालेला नाही. भविष्यात मोहोर येण्यास अनुकूल ठरणारी पालवी दिवसागणिक जून होत आहे. गेल्या आठवडाभरापासून थंडीचाही ज्वर हळूहळू वाढू लागला असून, भविष्यामध्ये मोहोर येण्यास ही थंडी अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे आंबा बागायतदार सुखावला आहे.
मुबलक आंबा एप्रिलमध्ये – बदलत्या वातावरणाचा फटका बसून अनेकवेळा आंबा कलमांना उशिरा मोहोर येतो. तो तयार होऊन बाजारपेठेत विक्रीसाठी जाण्याला साधारण एप्रिलचा शेवटचा आठवडा किंवा मे महिना उजाडतो; मात्र, तोपर्यंत आंब्याला बाजारपेठेत मिळणार दर घसरलेला असतो. अशावेळी बागायदार आंबा कॅनिंगला देतात. दरवर्षीच्या या आंबा कॅनिंगच्या स्थितीमध्ये उशिरा मोहोर आल्यास यावर्षी वाढ होणार का ? याकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
