हापूस’वर लहरी वातावरणाचा परिणाम…

मोहोर जास्त थंडी, ढगाळ वातावरण, प्रचंड धुके यामुळे अक्षरशः करपला आहे.

Must read

आधी थंडीचा लांबलेला पाऊस भग लहरीपणा आणि आता पुनर्मोहोराचा तडाखा ! अशा तिहेरी संकटात आंबा बागायतदार अडकला आहे. थंडीच्या लहरीपणामुळे झाडांना पुन्हा मोहोर येत असल्याने जुनी फळधारणा धोक्यात आली आहे. फूलकिडीच्या (थ्रिप्स) प्रादुर्भावाने बागायतदारांच्या चिंतेत भर घातली आहे. या निसर्गाच्या खेळामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली असून, यंदा एप्रिल उजाडल्याशिवाय हापूसची पेटी बाजारात स्थिरावणार नाही, अशी स्थिती आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हापूस आंबा कलमांना पहिल्या टप्प्यात ७० टक्के तर दुसऱ्या टप्प्यात २० टक्के मोहोर आला; परंतु हा सर्व मोहोर जास्त थंडी, ढगाळ वातावरण, प्रचंड धुके यामुळे अक्षरशः करपला आहे. त्यामुळे मोहोर चांगला आला असला, तरी दहा टक्केदेखील फळधारणा न झाल्यामुळे लाखो रुपये खते, कीटकनाशके, बुरशीनाशकांवर खर्च केलेले आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. आता बागायतदारांना तिसऱ्या टप्प्यातील मोहोरातून मिळणाऱ्या उत्पादनावर अवलंबून राहावे लागणार आहे. कोकणातील फळपिकांना गेल्या काही वर्षांपासून मोठा फटका बसत आहे. आंबा पीक तर गेली काही वर्षे सतत बदलत्या वातावरणाच्या चक्रव्युहात अडकल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात यावर्षी पाऊस लांबला – त्यामुळे आंबा हंगाम लांबणार, असा सुरवातीचा अंदाज होता. नोव्हेंबर ते डिसेंबर अखेरपर्यंतची झाडे मोहोराने बहरली; पण त्यानंतर वातावरणातील बदलामुळे आंबा बागा काळवंडल्या आहेत. मोहोर अक्षरशः करपून गेला आहे. आतापर्यंत लाखो रुपये खर्चुन खते, कीटकनाशक, बुरशीनाशकांच्या फवारण्या झाडांवर केल्या आहेत याशिवाय कित्येक मजूर बागांमध्ये कामाला आहेत.

कोकण विभागाचा महत्त्वपूर्ण वाटा – रत्नागिरी जिल्ह्यात अंदाजे ६७ हजार ७९० ते ६८ हजार ५५० हेक्टर क्षेत्रात हापूस आंब्याची लागवड होते. हापूस उत्पादनात रत्नागिरी जिल्हा देशात आघाडीवर आहे. या पिकातून जिल्ह्यात सुमारे १२३.०६ हजार टन आंबा उत्पादन मिळते जे कोकण विभागातील उत्पादनात महत्त्वपूर्ण वाटा उचलते.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article