अडीच महिन्यांनंतर पुन्हा मैदानात पाऊल ठेवणाऱ्या हार्दिक पंड्याने नाबाद तडाखेबंद अर्धशतक केले. त्यानंतर सर्वच गोलंदाजांनी भेदकता दाखवली. त्यामुळे भारताने पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. काही दिवसांपूर्वीच एकदिवसीय मालिका जिंकून लय मिळवलेल्या भारतीय संघाने आजच्या पहिल्या टी-२० सामन्यात आफ्रिकेला चारीमुंड्या चीत केले. तीन बाद ४८ असे अडचणीत सापडल्यानंतर भारतासाठी हार्दिक पंड्या संकटमोचक ठरला. त्याच्या २८ चेंडूंतील नाबाद ५९ धावांमुळे भारताने सहा बाद १७५ धावा उभारल्या आणि त्या सहजपणे निर्णायकही ठरवल्या. आफ्रिकेला १२.३ षटकांत ७४ धावांत गुंडाळले. बाराबती स्टेडियमवर सायंकाळच्या सत्रात चेंडू चांगलाच स्विंग होत होता. अर्शदीपने सुरुवातीलाच दोन दणके दिले. डी-कॉक आणि स्टब्स यांना माघारी धाडले. तेथूनच आफ्रिकेची दाणादाण उडाली.
नेविसने दडपण उडवण्यासाठी आक्रमक पवित्रा स्वीकारला; परंतु अक्षर पटेलने त्याला आपल्या पहिल्याच चेंडूवर बाद केले. अशीच आपल्या पहिल्या चेंडूवर हार्दिकने विकेट मिळवली आणि तेथून आफ्रिकेचा डाव कोसळत गेला. अर्शदीप, बुमरा, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन, तर हार्दिक आणि दुबे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. तत्पूर्वी, पुन्हा नाणेफेक गमावल्यामुळे प्रथम फलंदाजी करावी लागलेल्या भारताची अवस्था दोन बाद १७ आणि तीन बाद ४८ अशी झाली होती. यात शुभमन गिल, अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव माघारी फिरले होते. तिलक वर्मा आणि अक्षर पटेल यांनी पडझड काही प्रमाणात थांवबली; पण हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आला आणि सर्व चित्रच बदलले. त्याची सावधगिरी आक्रमक विचारांची होती. आल्या आल्या त्याने हल्ला सुरू केला. त्यामुळे भारताला अपेक्षित नसलेली पावणेदोनशे धावसंख्या उभारता आली. हार्दिकने एकूण सहा चौकार आणि चार षटकार मारले. त्याला शिवम दुबे आणि जितेश शर्मा यांनी अखेरच्या षटकांत मोलाची साथ दिली.
संक्षिप्त धावफलक : भारत : २० षटकांत ६ बाद १७५ (अभिषेक शर्मा १७ – १२ चेंडू, २ चौकार, १ षटकार, शुभमन गिल ४, सूर्यकुमार यादव १२ – ११ चेंडू, १ चौकार, १ षटकार, तिलक वर्मा २६, अक्षर पटेल २३, हार्दिक पंड्या नाबाद ५९ – २८ चेंडू, ६ चौकार, ४ षटकार, शिवम दुबे ११, जितेश शर्मा नाबाद १० (लुंगी एन्डिगी ४-०-३१-३, सिपाम्ला ४-०-३८-२) वि. वि. दक्षिण आफ्रिका : १२.३ षटकांत सर्वबाद ७४ (मार्करम १४, त्रिस्टन स्टब्स १४, डेवाल्ड ब्रेविस २२ – १४ चेंडू, ३ चौकार, १ षटकार, अर्शदीप सिंग २-०-१४-२, जसप्रीत बुमरा ३-०-१७-२, वरुण चक्रवर्ती ३-१-१९-२, अक्षर पटेल २-०-७-२, हार्दिक पंड्या २-०-१६-१, शिवम दुबे ०.३-०-१-१).
