नागवेलीच्या पानाला महागाईची ‘लाली’ आठवड्यात दर तिप्पट

पान बाजारात नागवेलीची पानं १२० रुपये शेकडा या दराने विकली जात आहेत.

Must read

कोकणच्या ग्रामीण भागात आजही चंची अथवा पानाचा डबा सोबत बाळगून पान सुपारी खाणारी अनेक मंडळी आहेत. पानाच्या अन्य साहित्याचे दर वाढत गेले तरीही नागवेलीची पानं मात्र केवळ ४० रुपये शेकडा या दराने मिळत होती. गेल्या आठवडाभरात मात्र हा दर तिप्पट झाला आहे. संगमेश्वर वगळता अन्यत्र हाच दर आणखी वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या संगमेश्वरच्या पान बाजारात नागवेलीची पानं १२० रुपये शेकडा या दराने विकली जात आहेत. कोकणच्या ग्रामीण भागात पान सुपारी जवळ असणारं शेतकरी वर्ग अथवा अन्य मंडळींचं नातं सर्वश्रुत आहे. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत अनेकदा पान सुपारी खाल्ली जाते. काही मंडळींना तर अर्ध्या एक तासाने पान सुपारी खाण्याची सवय असते. अशा मंडळींची तोंड काताने कायमचीच लाल झाल्याचे पाहायला मिळते. चंचीतील पानाची देवाण-घेवाण हा एक शिष्टाचार समजला जातो. अनेक कप्पे असलेली पानांची चंची अथवा डबा सोबत ठेवायला खवय्ये विसरत नाहीत.

एका पानाने अनेक गोष्टी साध्य करता येतात. दोन माणसं पारावर अथवा सार्वजनिक ठिकाणी भेटली तर, गप्पा सुरू होण्याआधी चंचीतील पान सुपारीची देवाण-घेवाण सुरू होते. कात खाल्ल्यावर आधी तोंड रंगते आणि नंतरच गप्पांचा फड रंगतो. चंचीत पानं कमी असतील, तर वेळ प्रसंगी अर्ध-अर्ध पान एकमेकांना दिले जाते, मात्र पानाची देवाण-घेवाण थांबत नाही. अर्ध्या एक तासाच्या गप्पात किमान चार पाच वेळा तरी पान खाल्लं जातं. सुपारी सध्या ५५० रुपये किलो या दराने विकली जात आहे. कधी तंबाखूचा दर वाढतो तर, कधी काताचा वाढतो. हे दर वाढले तरी नागवेलीचे पान मात्र त्याच्या नेहमीच्या दरावर स्थिर होते. संगमेश्वरच्या बाजारपेठेत गत आठवड्यापर्यंत केवळ ४० रुपये शेकडा या दराने मिळणाऱ्या नागवेलीच्या पानाने आठवडाभरात मोठी भरारी घेतली असून हा दर तिप्पट होत थेट १२० रुपये शेकड्यावर पोहचला आहे. असं असलं तरीही पान सुपारी खाणाऱ्या मंडळींकडून पानाला असणारी मोठी मागणी कायम आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article