नूतन नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी शहरवासीयांच्या जिव्हाळ्याच्या पाणीप्रश्नाला हात घातला आहे. साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्र आणि नैसर्गिक उताराने शहराला पाणीपुरवठा करणारे पानवल धरण याची आज नव्या सदस्यांनी पाहणी केली. त्याचा अभ्यास करून जलशुद्धीकरण केंद्राचा परिसर स्वच्छ करून तो बंदिस्त करण्याचा आणि तेथील कचऱ्यावर प्रक्रिया करून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना स्वच्छ आणि उच्चदाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी हा प्रयत्न असून, नवीन पदाधिकारी विधायक कामासाठी अॅक्शन मोडवर आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्याने नूतन नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर तातडीने पावले उचलली आहेत. त्यांनी प्रभाग ५ मधील सहकारी नगरसेवक सौरभ मलुष्टे, पूजा पवार यांना सोबत घेत प्रभाग ५ मधील पाण्याच्या टाकीची पाहणी केली. तत्पूर्वी त्यांनी नगरपालिका पाणी विभाग व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलावून घेतले. नगराध्यक्षांनी जलशुद्धीकरण केंद्र आणि पाण्याच्या टाकीबाबत माहिती घेतली.
पाण्याचे कशा पद्धतीने शहरात वितरण होते, हेही त्यांनी जाणून घेतले. स्वच्छ आणि मुबलक पाणी नागरिकांना मिळायला हवे, अशा सूचनाही त्यांनी स्पष्टपणे दिल्या. जलशुद्धीकरण केंद्राजवळच सध्या डंपिंग ग्राऊंड आहे तिथे शहरातील गोळा झालेला कचरा टाकला जातो. तेथील प्लास्टिक कचरा सर्वत्र उडत असतो. त्यामुळे प्लास्टिक कचरा पुनर्वापर करण्याचा प्रकल्प उभारण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली निधी मिळवून हा प्रकल्प कार्यन्वित करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. कचरा प्रकल्प लवकरच नव्या जागेत हलवण्याच्यादृष्टीनेही चर्चा करण्यात आली. कचरा उडून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत येऊ नये यासाठी तेथे स्वच्छता करून परिसर बंदिस्त करण्याच्या सूचना सुर्वे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाला त्यांनी भेट दिली. धरणाचे काम सुरू असून, जानेवारी अखेर हे काम पूर्ण होणार असल्याचे कंपनीच्या अभियंत्यांनी नगराध्यक्षांना सांगितले.
पालकमंत्र्यांशी चर्चा करणार – सध्या धरणाचे काम सुरू असल्याने पाणी नदीपात्रात थोडे पुढे अडवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जोशीनाल्यातून पुढे काजळी नदीला मिळणारे पाणी उचलून धरणात सोडण्याबाबतही विचार असून, त्याबाबत पालकमंत्री सामंत यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही नगराध्यक्षा सुर्वे यांनी स्पष्ट केले.
