खेड नगर परिषदेचे निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच खेडच्या राजकीय वर्तुळात प्रचंड हालचालींना वेग आला आहे. अधिकृत निकाल जाहीर होण्याआधीच सोशल मीडियावर राजकीय कार्यकर्ते, समर्थक आणि स्वयंघोषित विश्लेषकांकडून आकडेम ोडीचा खेळ जोरात सुरू झाला आहे. कोणता उमेदवार किती मतांनी निवडून येणार, कुणाला किती मते मिळणार, कोणाचा पराभव ठरलेला आहे, अशा स्वरूपाच्या पोस्ट सध्या फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. खेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ डिसेंबरला मतदान झाले. मात्र निकालाची तारीख २१ डिसेंबरला पुढे ढकलण्यात आली आहे.
त्यामुळे उमेदवारांबरोबरच कार्यकर्ते आणि समर्थकांमधून प्रत्येक प्रभागानुसार कानोसा घेतला जात असून मते म ोजल्याचा दावा करत काही पोस्टमध्ये चक्क विजयाचे गणित मांडले जात आहे. हा उमेदवार एवढ्या मतांनी निवडून येईल, या पक्षाला अमुक इतक्या जागा निश्चित, तर एका गटाचा धुव्वा उडणार अशा ठांम भाकितांनी सोशल मीडियाचे वातावरण चांगलेच तापले आहे. काही पोस्ट्समध्ये आकडेवारी इतक्या आत्म विश्वासाने मांडली जात आहे की, जणू निकाल आधीच जाहीर झाला आहे, असा भास निर्माण होत आहे. दरम्यान, या आकडेमोडीमुळे खेडमध्ये राजकीय चर्चाना अधिकच उधाण आले आहे. चहाच्या टपऱ्यांपासून ते कार्यालयांपर्यंत, तसेच घराघरांत निवडणुकीचे गणित रंगताना दिसत आहे.
समर्थक आपापल्या नेत्याच्या विजयाचा दावा करत असून विरोधकांच्या आकड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. काही ठिकाणी या पोस्ट्समुळे आरोप-प्रत्यारोपांची फैरीही झडत असल्याचे चित्र आहे. राजकीय जाणकारांच्या मते, सोशल मीडियावरील ही आकडेमोड म्हणजे कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न असू शकतो. मात्र प्रत्यक्ष निकाल मतदान यंत्रांमध्ये बंद असून तो मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियांवर फिरणाऱ्या दाव्यांकडे नागरिकांनी सावधगिरीने पाहावे, असे आवाहनही सुज्ञांकडून करण्यात येत आहे. एकूणच, निकालापूर्वीच खेड चे राजकारण कमालीचे तापले असून, अंतिम निकाल काय येणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. सोशल मीडियावरील विजयाच्या गणिताला प्रत्यक्षात किती सत्यतेची जोड मिळते, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.
