चिपळूण तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत यंदा केवळ पक्षीय समीकरणेच नव्हे तर घराणेशाहीचा मुद्दाही ऐरणीवर आणला आहे. राजकारणात घराणेशाही नवी नाही. त्याच धर्तीवर यंदा निवडणुकीत नेत्यांच्या कुटुंबातील तसेच नात्यांतील उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे घरातील उमेदवार निवडून यावा यासाठी नेते व त्यांचे कार्यकर्ते प्रचारात उतरलेले पाहायला मिळत आहेत. चिपळूण तालुक्यात आमदार शेखर निकम यांच्या पत्नी सावर्डे जिल्हा परिषद गटातून रिंगणात आहेत, तर आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा गुहागर तालुक्यातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहे. भाजप नेते प्रशांत यादव यांची मेहुणी शिरगाव पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत आहे. तिच्याविरोधात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ साळवे यांची सून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे या लढतीला महत्त्व प्राप्त झालेले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांची पत्नी खेर्डी जिल्हा परिषद गटातून उभी आहे. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख विनोद झगडे पत्नीसह निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खेर्डी पंचायत समिती गणातून भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अशा तीन पक्षाचे तालुकाध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात; मात्र खरंच, कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये संधी दिली जाते का, असा प्रश्न चिपळूण तालुक्यातील उमेदवारांकडे पाहून उपस्थित होऊ लागला आहे. कारण, उमेदवारांच्या रांगेत कार्यकर्त्यांच्या पुढे सामान्य नेत्यांची लाडकी मुले, पत्नी, सुना पुढे असल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे कार्यकर्त्यांना फक्त सतरंजा उचलायचे काम करावे लागत आहे. चिपळूण तालुक्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या बैठका झाल्या त्या वेळी उमेदवार ठरवताना नेत्यांनी आपल्या घरातील उमेदवारांची नाव दिली तर कार्यकर्त्यांकडून विरोध होईल म्हणून नेत्यांनी आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना तयार करून बैठकीत आपल्याच घरातील उमेदवाराचे नाव पुढे कसे येईल, याची काळजी घेतली आहे. त्याचे पडसाद मतदान पेटीतून कसे उमटणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
