तालुक्यातील मिरजोळे परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर वाढला आहे. सोनारवाडी येथील जंगल परिसरात बिबट्याने एकाच रात्रीत चार गुरे ठार केल्याची घटना पुढे आली आहे. त्यापैकी एका गुराचा बिबट्याने फडशा पाडला आहे. तसेच खेडशी-फणसवळे परिसरात कुत्रा आणि मांजराची पिल्ले मारल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. गावातील गुरे जंगलात चरवण्यासाठी सोडलेले असताना बिबट्याने हल्ला केला. एकाच ठिकाणी चार गुरांना मारल्यामुळे सोनारवाडी आणि मिरजोळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य रत्नदीप पाटील यांनी तत्काळ वनविभागाला याची खबर दिली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि मेलेल्या गुरांचे दहन करण्यात आले. गेल्या काही महिन्यापासून मिरजोळे, शीळ या भागात बिबट्याचा मुक्त संचार वाढलेला आहे. येथील गुरे, शेळ्या आणि पाळीव कुत्र्यांवर बिबट्याने हल्ले केले आहेत. कुत्र्यांची शिकार होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.
आंबा बागायतींमध्ये काम करणाऱ्या गुराख्यांना अनेकदा बिबट्याचे दर्शन होत असल्याने त्यांच्यातही मोठी भीती आहे. तीन वर्षांपूर्वी गावातील माळरानावर सडलेल्या अवस्थेत एक बिबट्याही आढळून आला होता. अलीकडे डफळचोळवाडी मिरजोळेला लागून असलेल्या खेडशी येथील परिसरातही बिबट्याचा संचार वाढला आहे. या वाडीत ग्रामस्थांच्या घराच्या अंगणात बांधलेल्या कुत्र्यांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. तसेच, रात्रीच्यावेळी बिबट्याचा सातत्याने होणारा वावर यामुळे डफळचोळवाडीतील ग्रामस्थांमध्येही प्रचंड दहशत वाढली आहे. सोनारवाडीतील गुरांवरील हल्ल्यामुळे संपूर्ण मिरजोळे आणि लगतच्या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
