कोकण रेल्वेमार्गावर तालुक्यातील एकमेव असलेल्या राजापूर रोड रेल्वेस्थानक खोलगट भागात असल्यामुळे चढ-उतार करताना प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावर लिफ्टची व्यवस्था करावी, अशी मागणी पंचक्रोशी ग्रामविकास समितीतर्फे कोकण रेल्वे प्रशासनाकडे केली होती. त्याला यश आले असून, कोकण रेल्वेने राजापूर रोड रेल्वेस्थानकात लिफ्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेमार्गावर राजापूर तालुक्यासाठी परिपूर्ण असे एकमेव राजापूर रोड रेल्वेस्थानक आहे. या ठिकाणी कोकणकन्या, तुतारी, मांडवी, नेत्रावती, दिवा सावंतवाडी या पॅसेंजर एक्स्प्रेससह उधना, मडगाव-नागपूर आणि काही हंगामी गाड्यांना थांबा आहे. त्यामुळे दररोज या स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. हे स्थानक खोलगट भागात उभारलेले असल्यामुळे प्रवाशांना वर-खाली ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागते.
सामानासह चढ-उतार करताना प्रवाशांना खूप अडचणी येतात. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवासी तसेच आजारी व्यक्तींना वर-खाली येताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या ठिकाणी लिफ्ट उभारावी, अशी मागणी पंचक्रोशी ग्रामविकास समितीने पत्राद्वारे कोकण रेल्वे प्रशासनाकडे केली होती. तसेच पंचक्रोशी ग्रामविकास समितीचे माजी अध्यक्ष अनिल भोवड, नूतन अध्यक्ष विश्वास राघव, सचिव संदेश मिठारी, प्रशासकीय समिती प्रमुख आदिनाथ कपाळे, कार्याध्यक्ष संतोष जोगळे, खजिनदार अनिल राऊत व इतर पदाधिकारी यांनी प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला होता. पंचक्रोशी ग्रामविकास समिती आणि त्यांचे सहकारी सातत्याने पाठपुरावा करत होते.
