लोटे औद्योगिक वसाहतीमधील प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती सुरू झाली आहे. महामंडळाने हे रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एमआयडीसीमधील रस्ते लवकरच खड्डेमुक्त होणार आहेत. काँक्रिटीकरणामुळे या परिसरातील उद्योजक व वाहतूकदारांच्या गैरसोयी दूर होणार आहेत. लोटे परशुराम ही रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी एमआयडीसी आहे. सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या या एमआयडीसीमध्ये साडेचारशेहून अधिक भूखंड आहेत. उद्योजक, कारखान्यामधील अधिकारी व कामगार तसेच परिसरातील ग्रामस्थ मिळून या भागात सुमारे २५ हजारांहून अधिक नागरिकांची एमआयडीसीमध्ये रेलचेल असते. एमआयडीसीमधील रस्त्यावरून अवजड माल वाहतुकीची वाहने ये-जा करत असतात. त्यामुळे एमआयडीसीमधील डांबरी रस्त्यांवर वारंवार खड्डे पडतात. एमआयडीसीने हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला तरी मुसळधार पाऊस आणि अवजड वाहतुकीमुळे खड्डे वाढत जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. खड्ड्यांमुळे उद्योजक आणि कारखान्यांमधील अधिकाऱ्यांच्या चारचाकी वाहनांचे वारंवार दुरुस्तीचे काम निघते. कामगारांच्या वाहतुकीसाठी असलेल्या बसचालकांनाही खड्ड्यांचा प्रचंड त्रास होत होता. या रत्नागिरी जिल्हा उद्योजक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, अॅड. राज आंब्रे, सीईटीपीचे अध्यक्ष डॉ. सतीश वाघ, तसेच लोटे परशुराम एमआयडीसीतील अनेक उद्योजकांनी या भागातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे व्हावेत, अशी मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती.
एमआयडीसीतील प्रमुख रस्त्यावरून लोटे परिसरातील काही गावांमध्ये जाता येते. त्या गावांमध्ये जाणाऱ्या एसटीच्या बसेससुद्धा एमआयडीसीतील प्रमुख रस्त्यांवरून जातात. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे रस्तेदुरुस्तीची मागणी केली होती. त्यामुळे माजी मंत्री रामदास कदम आणि राज्यमंत्री योगेश कदम यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करून एमआयडीसीतील रस्तेदुरुस्तीसाठी निधी मंजूर करून घेतला. उद्योगमंत्री सामंत यांनी सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यासाठी सुमारे १५ कोटीचा निधी मंजूर केल्यानंतर त्याची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आणि प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली आहे. सध्या एक्सेल फाटा कडे येणाऱ्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटचे काम सुरू आहे. एमआयडीसीतील प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर उद्योजक, कामगार आणि स्थानिकांची गैरसोय आता दूर होणार आहे. लोटे येथे महामंडळाचे अग्निशमन केंद्र आहे. एमआयडीसीमध्ये किंवा चिपळूण आणि खेडमध्ये कुठेही आगीची घटना घडली. लोटे अग्निशमन केंद्राचे बंब घटनास्थळी तत्काळ जातात. त्यांनाही चांगल्या रस्त्यांमुळे आता अधिक गतीने घटनास्थळी पोचणे सहज शक्य होणार आहे.
