HomekonkanChiplunचिपळूणवर भरभरून प्रेम करणारे दादा गेले बाजारपेठ बंद ठेवून पाळला गेला दुखवटा

चिपळूणवर भरभरून प्रेम करणारे दादा गेले बाजारपेठ बंद ठेवून पाळला गेला दुखवटा

आम. शेखर निकम यांच्या तोंडून निघाले आणि त्यांना गहिवरून आले.

महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. सकाळी ही बातमी पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त होऊ लागली. चिपळूणवर अजित दादांनी भरभरून प्रेम केले, येथील निकम कुटुंबाशी तर त्यांचे अत्यंत जवळचे स्नेह होते. जेव्हा जेव्हा अजित दादा चिपळूणात आले, त्या-त्या वेळी सावर्डे येथे आम. शेखर निकम यांच्या घरी आवर्जून भेट देत त्यांनी शेवटापर्यंत स्नेह जपला होता. अर्थमंत्री म्हणून त्यांनी चिपळूणसाठी नेहमीच हात सैल ठेवला होता. त्यामुळे अजित दादा नेहमीच चिपळूण वासीयांच्या आठवणीत राहिले. त्यामुळेच त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच चिपळूण बाजारपेठ बंद ठेवून दुखवटा व्यक्त करण्यात आला. चिपळूणवर त्यांचे बारीक लक्ष तर होतेच, त्याहीपेक्षा दादांनी चिपळूणवर भरभरून अलोट प्रेम केले. स्व. गोविंदराव निकम व खा. शरद पवार हे जिवाभावाचे मित्र, वर्षानुवर्षे दोघांनी ही मैत्री जपली, तर पुढे दुखरी पिढी असलेल्या अजित दादा व शेखर निकम यांनी देखील त्याच जोमानें हा वारसा पुढे जपला. अजितदादा ज्या-ज्या वेळी चिपळूणमध्ये आले त्यावेळी त्यांनी सावर्डे येथे जाऊन निकम कुटुंबाची भेट घेतली, अनेकवेळा त्यांचे भोजन देखील निकम कुटुंबाबरोबर होत असे. आम. शेखर निकम यांच्यावर अजित दादा यांचे इतके प्रेम होते की ते ये शेखर म्हणून आपलेपणाची हाक मारत होते. तसेच निकम कुटुंबात ते सहज मिसळून ही जात होते. आम. शेखर निकम यांनी हक्काने मागावे आणि अजितदादांनी सहज ते द्यावे असे गेले अनेक वर्षाचे समीकरण राहिले होते. त्यामुळेच अजित दादांनी भाजप बरोबर युती केल्यानंतर आम. निकम थेट दादा बरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता.

स्व. अजित दादांनी फक्तचिपळूणवर प्रेमच केले नाही तर त्यांनी चिपळूणला निधी देताना देखील हात कधीच आखडता घेतला नव्हता. महापुरानंतर वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी बचाव समिती व नागरिकांनी उभारलेल्या जन आंदोलनाची तात्काळ दखल घेत अजित दादा पवार यांनी १० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. तसेच पाठबंधारे विभागाची संपूर्ण यंत्रणा त्यांनी चिपळूणमध्ये पाठवून दिली होती. त्याशिवाय येथील नलावडा बंधारा, पेठमाप पूल, पवन तलाव मैदान, चिपळूण नगरपरिषद इमारत आशा अनेक कामांना अजित दादांनी भरभरून निधी दिला होता. त्यामुळेच चिपळूण वासीय देखील दादावर अतूट प्रेम करत होते. त्यांच्या निधनाने वृत्त समजताच आम. शेखर निकम व त्यांच्या पत्नी पूजा ताई निकम अक्षरशः ढसाढसा रडले. आम. शेखर निकम यांनी तर सोशल मीडियावर ‘संपलो’ इतकीच पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. निकम कुटुंबाबरोबरच अजित दादांनी आ. भास्कर जाधव यांच्या बरोबर देखील आपली मैत्री घट्ट ठेवली होती. आ. जाधवांच्या घरी देखील आले होते. तसेच माजी आ. रमेशभाई कदम यांचा देखील अजितदादा नेहमीच सन्मान करत होते. इतके आपुलकीचे नाते त्यांनी चिपळूण आणि चिपळूण मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी जपले होते. त्यामुळेच त्यांच्या निधनाने वृत्त समजताच चिपळूण मधील व्यापाऱ्यांनी तात्काळ बाजारपेठ बंद करून दुखवटा पाळला.

माझा आधारवड गेला-आम. निकम – अजित दादा आणि आमचे नाते कौटुंबिक होते, राजकारणा पलीकडे जाऊन त्यांनी मला व माझ्या कुटूंबाला प्रेम, स्नेह आणि आधार दिला. आज तो माझा आधारच निघून गेला आहे. मी काय बोलू हेच मला कळत नाही. माझ्याकडे शब्द राहिले नाहीत. इतकेच शब्द आम. शेखर निकम यांच्या तोंडून निघाले आणि त्यांना गहिवरून आले. त्यांच्या डोळ्यातून टिपा पडू लागले होते.

कणखर नेतृत्व हरपले आ. जाधव – स्व. अजित दादा यांच्या बरोबर मी १५ वर्ष एकत्र काम केले. तसेच गेली ३५ वर्ष मी सभागृहात जवळून त्यांना अनुभवले आहे. एक करारी, कणखर तसेच कर्तव्यकठोर व शब्दाचे पक्के असे ते नेतृत्व होते. त्यांच्या निधनाने फक्त पवार कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या कुटुंबातर्फे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून स्व. अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments