रत्नागिरीकरांना उन्हाळ्यात पाणीकपात किंवा टंचाईची झळ पोहोचू नये यासाठी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे आणि पाणी समिती सभापती निमेश नायर यांनी नियोजनात्मक पावले उचलली आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ आणि पानवल धरणावर आज या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी पाहणी करून नळपाणी योजनेअंतर्गत राहिलेली कामे जाणून घेतली. त्याचबरोबर पाणीयोजनेचे काम करणाऱ्या अन्वी कंपनीच्या मालकांना संपर्क साधून तातडीने उर्वरित कामे पूर्ण करून देण्याची सूचना केली. उन्हाळ्यातील एप्रिल महिन्यापासून रत्नागिरी शहरात पाणीकपात केली जाते. पावसाळा नियमित सुरू होईपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन होते. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये आंबा, काजू, फणसाचा मोसम असतो. त्यामुळे पर्यटक, चाकरमानी पाहुणे येत असतात. अशावेळी पाणीकपातीमुळे गैरसोय होते. ही वेळ येऊ नये आणि त्यासाठी पाणीपुरवठा नियमित राहावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शीळ धरणातून जॅकवेलपर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे; परंतु या जलवाहिनीच्या काही ठिकाणी काँक्रिटचे काम झालेले नाही.
त्यामुळे पावसाळ्यात ही जलवाहिनी वाहून जाण्याची भीती असल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर ट्रान्सफॉर्मरची कनेक्शने व येथील शेडचे काम झाले नसल्याचेही आढळून आले. धरणावरील पाच पंपांच्या सुस्थितीबाबतही पाहणी झाली. पानवल धरणावरून शहराकडे येणाऱ्या जलवाहिनीचे काही ठिकाणचे काम रखडले आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षात या धरणातील पाणी वापरताच आलेले नाही. हे पाणी यंदाच्या उन्हाळ्यात वापरता येऊ शकेल, या दिशेने या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे नळपाणी योजनेच्या ठेकेदाराला येथील राहिलेली कामे पूर्ण करून देण्यास सांगण्यात आले. ठेकेदारानेही ११ फेब्रुवारी रोजी कामे करून देण्याबाबतचे नियोजन करण्याचे आश्वासन दिले आहे.
जुने वॉल्व्ह बदलावे लागणार – पानवल धरणातील जुने वॉल्व्ह बदलावे लागणार आहेत. त्याचबरोबर ज्या ठिकाणी जलवाहिनी अंथरण्याचे काम राहिले आहे त्या ठिकाणच्या अडचणी मार्गी लावण्यातही पुढाकार घेतला आहे. जुने वॉल्व्ह बदलण्यासाठी पालकमंत्र्यांकडे जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. या कामाचे अंदाजपत्रक पाटबंधारे विभागाकडून बनवून घेतले जाणार आहे. दोन्ही धरणांच्या भेटीवेळी नगराध्यक्षा आणि सभापतींसोबत नगरसेवक अभिजित दुडये, नगरपरिषद पाणी विभागाचे अधिकारी इंद्रजित चाळके, पवार, सूरज मयेकर आदी उपस्थित होते.
