HomeMaharashtra News'बिहार भवन' वरून वाद ! मुंबईतील संभाव्य उभारणीला मनसेचा विरोध

‘बिहार भवन’ वरून वाद ! मुंबईतील संभाव्य उभारणीला मनसेचा विरोध

राजकारणात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे आहेत.

मुंबईत बिहार सरकारतर्फे उभारण्यात येणाऱ्या भव्य ‘बिहार भवन’च्या प्रस्तावावरून आता राजकीय वातावरण तापले आहे. ३१४ कोटी रुपये खर्चुन बांधण्यात येणाऱ्या या ३० मजली इमारतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र विरोध दर्शवला असून, मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे आहेत. मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी बिहार भवनावरून टीका केली आहे. मुंबईत बिहार भवनाची गरजच काय, असा सवाल उपस्थित करीत त्यांनी यामागे मोठे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे. किल्लेदार म्हणाले, की उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे. अशा प्रकारे कोणाचेही लाड मुंबईत खपवून घेतले जाणार नाहीत. मनसेने या प्रकल्पाविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, हा प्रकल्प होऊ देणार नाही, असे संकेत त्यांनी दिले आहेत. बिहार सरकार या प्रकल्पाकडे मानवतावादी आणि विकासात्मक दृष्टिकोनातून पाहात असले तरी मुंबईतील राजकीय परिस्थितीत याला राजकीय रंग चढला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावरून आगामी काळात मोठा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

बिहार मंत्रिमंडळाचा निर्णय – दिल्लीतील बिहार भवनच्या धर्तीवर मुंबईत हे भवन उभारण्याचा निर्णय बिहार मंत्रिमंडळाने घेतला आहे. यासाठी ३१४.२० कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. बिहारमधून टाटा मेमोरियलसारख्या रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण आणि सरकारी कामासाठी येणाऱ्या नागरिकांची राहण्याची सोय करणे हा यामागील उद्देश आहे. ३० मजली या इमारतीत १७८ खोल्या, २४० बेडची डॉर्मिटरी (सामूहिक निवासस्थान) आणि अद्ययावत पार्किंग व्यवस्था असेल.

मराठी संघटनांमध्ये नाराजी – मुंबईत सध्या मराठी अस्मितेचा मुद्दा तापलेला असताना भाजप-जेडीयू सरकारने निवडणूक काळात उत्तर भारतीय मतदारांना चुचकारण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप मनसेकडून होत आहे. मुंबईत आधीच जागेची टंचाई असताना दुसऱ्या राज्यासाठी इतक्या मोठ्या इमारतीला जागा देणे आणि त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करणे यावरून मराठी संघटनांमध्ये नाराजी आहे. अशा प्रकारचे भवन उभारल्यास इतर राज्येही अशाच मागण्या करतील, ज्यामुळे मुंबईतील नागरी सुविधांवर ताण येईल, असाही एक मतप्रवाह आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments