महिला प्रीमियर लीगमध्ये गतविजेत्या मुंबई इंडियन्सला तीन दिवसांत दोनदा यूपी वॉरियर्स संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. स्पर्धेत पहिले तीन सामने गमावणाऱ्या यूपीने मिळवलेले दोन्ही विजय मुंबई संघाविरुद्धचे आहेत. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी गोलंदाजी तसेच फलंदाजीत खालावली. यूपीने प्रथम फलंदाजीत आठ बाद १८७ अशी भक्कम धावसंख्या उभारली. त्यानंतर मुंबईला सहा बाद १६५ धावांवर रोखले. मुंबई संघाने आतापर्यंत मिळवलेल्या दोन विजयांत हरमनप्रीत कौरने फलंदाजीत प्रभावी खेळ केला. इतरांकडून मात्र अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. यातच मुंबई संघाचे व्यवस्थापन सलामीच्या जोडीत सातत्याने बदल करत असल्याचाही फटका त्यांना बसत आहे. आज हेली मॅथ्यूज आणि सजीवन सजना यांना सलामीला पाठवण्यात आले, तर गेल्या सामन्यापर्यंत सलामीला खेळणारा कमलिनी आज आठव्या क्रमांकावर आली.
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी ठोस सुरुवातीची गरज होती; परंतु मुंबईची ११ षटकांत पाच बाद ६९ अशी अवस्था झाली. यात हरमनप्रीतही माघारी आली होती. तेथेच मुंबईचा पराभव निश्चित झाला होता. सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर खेळणाऱ्या अनुक्रमे अमेरी केर (४९) आणि अमनज्योत कौर (४१) यांनी ४५ चेंडूंत ८३ धावांची भागीदारी केली; परंतु आव्हानांचा डोंगर वाढतच होता. गेल्या सामन्यात अमनज्योत सलामीला खेळली होती. आज ती बाद झाल्यावर मुंबई संघाचा पराभव अटळ होता.
संक्षिप्त धावफलक : यूपी वॉरियर्स: २० षटकांत ८ बाद १८७ (मेग लेनिंग ७०-४५ चेंडू, ११ चौकार, २ षटकार, फोबे लिचफिल्ड ६१- ३७ चेंडू, ७ चौकार, ३ षटकार, हर्लिन देओल २५ १६ चेंडू, २ चौकार, १ षटकार, च्लोई ट्रायॉन २१ १३ चेंडू, १ चौकार, १ षटकार, निकोला केरी ४-०-३८-१, नेंट स्किवर ब्रेट ४-०-२२-१, अमेरी केर ४-०-२८-३) वि. वि.
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ६ बाद १६५ (हेली मॅथ्यूज १३, संजीवन सजना १०, नॅट स्किवर ब्रंट १५, हरमनप्रीत कौर १८, निकोला केरी ६, अमेरी केर ४९ – २८ चेंडू, ६ चौकार, १ षटकार, अमनज्योत कौर ४१ – २४ चेंडू, ४ चौकार, ३ षटकार, क्रांती गौड ४-०-३२-१, शिखा पांडे ४-०-३०-२, दीप्ती शर्मा ४-०-३५-१)
