शहरांसह ग्रामीण भागातही मोकाट जनावरे, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न भेडसावत आहे. विशेषतः शहराजवळील गावांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी ग्रामीण भागात ग्रामविकास अधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकण्यात येणार आहे. तालुक्यात सुमारे चार हजार भटकी कुत्री असल्याची नोंद असून, नेहमीचे कामकाज संभाळून ही अतिरिक्त जबाबदारी सांभाळताना आता ग्रामसेवकांना कसरत करावी लागणार आहे. ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. या कुत्रे वाढीवर नियंत्रण ठेवायचे कसे हा आहे. विशेषतः शहरालगतच्या गावांमध्ये व पंचक्रोशीच्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या अधिक आहे. यामुळे अपघातांचे व श्वानदंशाचे प्रमाणही वाढत आहे. काही महिन्यापूवों सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्यांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्य शासनाने जिल्हा परिषद व पंचायत समितीला दिल्या आहेत. रत्नागिरी पंचायत समितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत पशुसंवर्धन विभागामार्फत याची माहिती तालुक्यातील ग्रामविकास अधिकाऱ्यांना देण्यात आली. तालुक्यात २०२४ मध्ये झालेल्या पशू जनगणनेमध्ये ३ हजार ८४४ भटकी कुत्री आढळून आली होती. रत्नागिरी शहरामध्ये ८३५ भटक्या कुत्र्यांची नोंद आहे.
मात्र या नोंदीहून अधिक भटकी कुत्री असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रत्नागिरी शहरालगतच्या नाचणे, कुवारबाव, कारवांचीवाडी, मिरजोळे, शिरगाव, भाट्ये या भागातही भटक्या कुत्र्यांचे प्रमाण अधिक आहे. पंचक्रोशीच्या पाली, पावस, जाकादेवी, गणपतीपुळे, खंडाळा या भागातही भटक्या कुत्र्यांची संख्या अधिक आहे. गावातील भटक्या कुत्र्यांची नोंद ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ठेवायची आहे. लवकरच या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने राबवली जाणार आहे. निर्बीजीकरण झाल्यानंतर किमान सहा ते सात दिवस त्यांना निवारा शेड उभारून ठेवावे लागणार आहे. कामे करायची की कुत्र्यांच्या पाठीमागे फिरायचे आधीच विविध योजना राबवताना ग्रामविकास अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात नवीन कामामुळे ग्रामविकास अधिकारी ही नवीन जबाबदारी कशी पार पाडावी या विचारात आहेत. विकासकामे करायची की कुत्र्यांच्या पाठून फिरायचे, असा प्रश्नही काही ग्रामविकास अधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
