बदलत्या वातावरणामुळे कोकण किनारपट्टीला वारंवार चक्रीवादळाचा धोका निर्माण होत आहे. फयान चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर किनारी भागातील मानवीवस्तीला संरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्याच्या किनाऱ्यावर ३ ठिकाणी सायक्लॉन सेंटर (निवाराशेड) उभारण्याचा निर्णय सात वर्षांपूर्वी झाला. त्यानंतर तौक्ते, निसर्ग, महान अशी अनेक चक्रीवादळे किनाऱ्यावर धडकली तरी सायक्लॉन सेंटरला उभारण्याचा मुहूर्त काही मिळालेला नाही. तीन कोटीवरून या सेंटरची नवीन अंदाजपत्रके १५ कोटीवर गेले. तीनवेळा निविदा प्रसिद्ध झाली तरी त्याला प्रतिसाद न मिळाल्याने हे काम रखडले आहे. एखाद्या मोठ्या वादळानंतर शासनाला जाग येणार काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे. फयान चक्रीवादळाने जिल्ह्याच्या किनारपट्टीवर थैमान घातल्याने मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली. भविष्यात अशा प्रकारे चक्रीवादळे आली तर किनारी भागातील नागरिकांना सुरक्षित आसरा मिळावा यासाठी सायक्लॉन सेंटरला शासनाने मंजुरी दिली.
२०१८ मध्ये जिल्ह्यातील दाभोळ, हर्णै, सैतवडे या तीन ठिकाणी प्रत्येक ३ कोटीचीही सायक्लॉन सेंटर मंजूर झाली. पत्तन विभागामार्फत या सेंटरच्या उभारणीसाठी निविदा मागवण्यात आल्या. एकदा नव्हे तर दोनवेळा निविदा मागवूनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. जी प्लस श्री असे या सायक्लॉन सेंटरचे स्ट्रक्चर होते. चक्रीवादळातही किनारी भागातील नागरिक या सेंटरमुळे सुरक्षित राहतील यासाठीचा हा प्रस्ताव आहे; परंतु सात वर्षे झाली तरी सेंटर उभारण्याचे काम सुरू आहे; परंतु त्याला अजून काही मुहूर्त मिळालेला नाही. आता पत्तन विभागाला सुधारित अंदाजपत्रक करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार जी प्लस श्री असा ढाचा उभारण्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. विलंबामुळे तीन कोटीचे हे अंदाजपत्रक आता १५ कोटीवर गेले आहे. नवीन अंदाजपत्रक शासनाला पाठवून दोन वर्षे होत आली तरी या प्रस्तावांना मंजुरी मिळालेली नाही. पत्तन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. मंत्रालय स्तरावरही निविदा काढली तरी त्याला प्रतिसाद नाही. शासनाच्या उदासीनतेमुळे आणि प्रतिसाद न मिळाल्याने लालफितीत ही अंदाजपत्रके अडकून पडली आहेत.
एक नजर – पत्तन विभागाकडून तीनवेळा निविदा प्रक्रिया, एकालाही प्रतिसाद नाही, मंत्रालय स्तरावर निविदा, त्यालाही प्रतिसाद नाही
