HomeRatnagiriजप्त मालाचा लिलाव करण्याचे आदेश आरजू प्रायव्हेट लिमिटेड

जप्त मालाचा लिलाव करण्याचे आदेश आरजू प्रायव्हेट लिमिटेड

मशिनरीसह सुमारे चार कोटी रुपयांचा कच्चा आणि पक्का माल पडून आहे.

मिरजोळे एमआयडीसीतील आरजू प्रायव्हेट लिमिटेड कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी कंपनीच्या गोदामातील कच्चा माल, तयार झालेला पक्का माल आणि मशिनरी यांसह अनेक वस्तू जप्त केल्या होत्या. पोलिस विभागाच्या विनंतीवरून, शासनाने जप्त मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी व पुढील कार्यवाहीसाठी उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांची सक्षम प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. जप्त मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. याबाबत उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने नुकतीच लवकरात लवकर लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, असे देसाई यांनी सांगितले. याबाबत देसाई यांनी दिलेली माहिती अशी, रोजगार आणि आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरजू टेक्सोल कंपनीचे अखेर दिवाळे निघाले. कंपनीविरोधात तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी एमआयडीसीतील त्यांचे सुसज्ज कार्यालय, एक प्रशिक्षण केंद्र आणि पाच गोदाम सील केले आहेत. या कारवाईमुळे मशिनरीसह सुमारे चार कोटी रुपयांचा कच्चा आणि पक्का माल पडून आहे.

या सर्व मालमत्ता भाड्याने घेतल्याने कंपनीची वैयक्तिक मोठी मालमत्ता नसल्याचे उघड झाले आहे. जप्त मालमत्तेची पाहणी आणि मोजदाद पूर्ण झाल्यावर अंतिम अहवाल तयार करून महाराष्ट्रातील ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण कायद्यानुसार पडून असलेल्या कच्च्या मालाच्या लिलाव प्रक्रियेची परवानगी न्यायालयाकडून मागण्यात येणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारींची रिघ सुरूच असून, आतापर्यंत ५८७ गुंतवणूकदारांनी तक्रारी दाखल केल्या. यावरून कंपनीची व्याप्ती मोठी असून, गुंतवणूकदारांना कोट्यवधींची फसवणूक केल्याचे स्पष्ट होते. एमआयडीसीत कंपनीने ज्या जागा भाड्याने घेतल्या आहेत त्यापैकी फक्त एका जागेसाठी एमआयडीसीची परवानगी घेतली आहे, तर उर्वरित चार जागांसाठी कोणतीही परवानगी नाही. त्यामुळे तपासाच्यादृष्टीने पोलिसांनी ऑफिस, ट्रेनिंग सेंटर आणि गोदाम सील केले आहे. आतापर्यंत फसवणुकीचा आकडा सात कोटींच्या वर गेला आहे; मात्र कंपनीकडे अजूनही ४० ते ५० लाखांच्या मशिनरीसह कच्चा-पक्का असा चार कोटींचा माल पडून आहे. सक्षम प्राधिकृत अधिकारी देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पोलिसांसमवेत एकूण पाच गोदामांची तपासणी केली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments