HomekonkanChiplunचिपळूणमधील वाहनतळ जागा नव्या वळणावर…

चिपळूणमधील वाहनतळ जागा नव्या वळणावर…

वाहनतळाजवळील इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊनही ती जागा सध्या 'ओसाड आणि पडीक' अवस्थेत आहे.

चिपळूण नगरपालिकेने उक्ताड येथे उभारलेले अटलबिहारी वाजपेयी वाहनतळ गेल्या चार वर्षांपासून वापराविना पडून आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही हे वाहनतळ बाजारपेठेपासून दूर असल्याने नागरिक येथे वाहने लावण्यास उत्सुक नाहीत. या पार्श्वभूमीवर आता या जागेचे आरक्षण बदलून किंवा तिचा व्यावसायिक वापर करून पालिकेचे उत्पन्न वाढवता येईल का, यावर गांभीर्याने विचार सुरू झाला आहे. वाहनतळाच्या सद्यःस्थितीचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी या परिसराची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक आशिष खातू, महंमद फकीर, तसेच बांधकाम विभागाचे डफळ, निंबाळकर, रविकांत सातपुते, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते आणि आरोग्य निरीक्षक सुजित जाधव उपस्थित होते. उक्ताड येथे वाहने उभी करून नागरिक चालत बाजारपेठेत येण्यास उत्सुक नसल्यामुळे हे वाहनतळ असून, नसल्यासारखेच आहे. गेल्या ३-४ वर्षांत या वाहनतळाचा वापर वाढवण्यासाठी पालिकेकडूनही कोणत्याही ठोस हालचाली झाल्या नाहीत. परिणामी, त्याचा वापरच थांबला आहे. पालिकेकडून तिथे कर्मचारी नेमून वाहने उभी करण्यासाठी सातत्याने चालकांना सूचना देणे आवश्यक होते.

वाहनतळाजवळील इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊनही ती जागा सध्या ‘ओसाड आणि पडीक’ अवस्थेत आहे. हे वाहनतळ मोक्याच्या ठिकाणी असल्याने त्याचा व्यावसायिक वापर झाल्यास पालिकेच्या तिजोरीत मोठी भर पडू शकते. यासाठी प्रशासनाकडून ही जागा लग्नसमारंभ, सभा किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ही जागा भाड्याने देण्याचा विचार सुरू आहे. तसेच या जागेचा वापर व्यावसायिक गाळे किंवा कार्यालयीन इमारत उभी करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मूळ आरक्षणात बदल करणे आवश्यक आहे तरच हे उत्पन्न मिळवण्याचे मार्ग अवलंबता येणार आहेत. दरम्यान, येथील मालमत्ता नगरपालिकेची असून तिन्ही बाजूंनी गेट नसल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे तातडीने गेट बसवून या मालमत्तेची योग्य निगा राखावी, असे आदेश नगराध्यक्षांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. वाहनतळ म्हणून उभारण्यात आलेला हा परिसर प्रत्यक्षात वाहनचालकांच्या उपयोगात येत नाही.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments