HomeMarathikonkanरत्नागिरीमध्ये पोलिस अधिकाऱ्याने वाचवला तरुणाचा जीव

रत्नागिरीमध्ये पोलिस अधिकाऱ्याने वाचवला तरुणाचा जीव

प्रेमात फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून तरुणाने पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

शहराला जोडणाऱ्या भाट्ये पुलावर दोन दिवासांपूर्वी रात्री एक थरारक घटना घडली. प्रेमात फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून एका ३० वर्षीय तरुणाने पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला; मात्र, कर्तव्य बजावत असलेल्या रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक अजय मोहिते यांनी वेळीच धाव घेत या तरुणाला वाचवले. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अजय तुळशीराम मोहिते हे भाट्ये चेकपोस्ट येथे कर्तव्यावर होते. त्या वेळी एका अनोळखीने धावत येऊन खबर दिली की, भाट्ये पुलावर एक व्यक्ती संरक्षक कठड्यावर उभी असून, आत्महत्या करण्याच्या तयारीत आहे. ही माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता अजय मोहिते यांनी दुचाकीवरून घटनास्थळी धाव घेतली. पुलावर पोहोचताच त्यांना एक तरुण पुलाच्या संरक्षक कठड्यावर बसलेला दिसला.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मोहिते यांनी अत्यंत शिताफीने हालचाल केली. संबंधित तरुणाला काही समजण्याच्या आतच त्यांनी मागच्या बाजूने जाऊन त्याला घट्ट पकडले आणि कठड्यावरून खाली खेचले. पोलिसांनी तरुणाला सुरक्षित जागी आणून त्याला शांत केले. चौकशी केली असता त्याने आपले नाव सांगितले. आत्महत्येचे कारण विचारले असता, एका मुलीने प्रेमात फसवले असल्याने मी जीवन संपवण्यासाठी येथे आलो होतो, असे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याचे समुपदेशन केले आणि त्याला सुखरूप त्याच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक – तरुणाचा जीव वाचवल्याबद्दल सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अजय मोहिते यांचे कौतुक होत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलिस अधीक्षक महामुनी, उपअधीक्षक नीलेश माईणकर आणि शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी मोहिते यांच्या या कामगिरीची दखल घेत त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments