पोलिस दलातील १०८ रिक्तपदासाठी भरती

तब्बल ६ हजार ४७९ उमेदवारांनी अर्ज दाखल झाले आहेत.

Must read

जिल्हा पोलिस दलातील रिक्त पदांसाठी अखेर भरती प्रक्रियेचे नियोजन पूर्ण झाले आहे. शुक्रवार (ता. १३) पासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील एकूण १०८ जागांसाठी तब्बल ६ हजार ४७९ उमेदवारांनी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे एका-एका जागेसाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडण्यासाठी सीसीटीव्ही, व्हिडिओ शुटिंग केले जाणार आहे. कोणत्याही अफवांना किंवा आमिषांना बळी पडू नका, असे आवाहन पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले आहे. जिल्हा एमआयडीसीमध्ये क्रीडांगणाच्या रिकाम्या जागेत ही प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेमध्ये १०८ पोलिस शिपाई पदांचा समावेश असून, त्यामध्ये ८ पदे चालक पदासाठी राखीव आहेत. १३ तारखेपासून सुरू होणाऱ्या या प्रक्रियेत सर्वात आधी उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. कागदपत्रे वैध ठरलेल्या उमेदवारांनाच पुढील टप्प्यात म्हणजेच मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरवले जाईल. मैदानी चाचणीमध्ये धावणे, गोळाफेकीसारख्या शारीरिक क्षमता चाचण्यांचा समावेश असणार आहे.

भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार घडू नये आणि गुणवत्ताधारक उमेदवारांनाच संधी मिळावी, यासाठी पोलिस दलाने कंबर कसली आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली पार पडणार असून, प्रत्येक टप्प्याचे व्हिडिओ शूटिंग केले जाणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून उमेदवारांच्या कामगिरीची नोंद केली जाईल, ज्यामुळे वशिलेबाजी किंवा मानवी त्रुटींना वाव उरणार नाही. काही समाजकंटक किंवा मध्यस्थ भरती करून देण्याचे आमिष दाखवून उमेदवारांची फसवणूक करण्याची शक्यता असते; मात्र पोलिस अधीक्षक कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, निवड प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित आणि पारदर्शक असणार आहे. कोणत्याही व्यक्तीने पैसे किंवा इतर आमिष दाखवल्यास त्वरित पोलिस प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article