चिपळूण पालिकेच्या कारभारासाठी नव्या जागेचा शोध

करवाढ न करता पाणी विभागाकरिता नागरिकांकडून विविध विषयांचे अर्ज दाखल केले जातात.

Must read

चिपळूण नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व विषय समिती सभापतींचा समावेश असलेल्या स्थायी समितीची बैठक नुकतीच झाली. या वेळी स्थायी समितीमध्ये पालिकेचा २०२६ चा अर्थसंकल्प तत्त्वतः मंजूर करण्यात आला तसेच पालिकेची इमारत धोकादायक झाल्यामुळे इतर इमारतींमध्ये प्रशासन हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे स्थायी समितीमधील मंजूर बजेटमध्ये कोणतीही करवाढ सुचवण्यात आली नाही. तब्बल चार वर्षानंतर चिपळूण पालिकेचे आर्थिक अंदाजपत्रक निवडून आलेल्या सदस्यांच्या माध्यमातून लवकरच सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मंजुरीसाठी येणार आहे. चिपळूण पालिकेच्या स्थायी समितीची बैठक डीबीजे महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये घेण्यात आली. या वेळी मागील चार वर्षाच्या आर्थिक अंदाजपत्रकावर काही काळ चर्चा झाली. त्यानंतर पुढील अंदाजपत्रकामध्ये प्रशासनाकडून काही उपाययोजना सुचवण्यात आल्या. त्यानुसार प्रत्यक्षात कुठलीही करवाढ न करता पाणी विभागाकरिता नागरिकांकडून विविध विषयांचे अर्ज दाखल केले जातात.

त्यामध्ये नळजोडणी बंद करणे, दुरुस्ती करणे, जागा बदलणे, नाव दुरुस्त करणे आदी विषयांकरिता शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच घरपट्टी करासंदर्भात कोणतीही वाढ करण्यात आली नसून, जुन्या दरानेच कर आकारणी करण्यात येणार आहे. दरम्यान, सध्या ज्या इमारतीत कामकाज सुरू आहे ती मुख्य जुनी इमारत धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार, या इमारतीमधील कामकाज थांबवून अन्यत्र कामकाज सुरू करावे, अशा सूचनेनुसार लवकरच आता पावसाळ्यापूर्वी इमारतीमधील कामकाज थांबवून शहरातील अन्यत्र इमारतीमध्ये कामकाज नेण्याबाबत सर्वानुमते निर्णय झाला. त्या दृष्टीने शहरातील नागरिकांना मध्यवर्ती ठिकाण व पालिकेचे संपूर्ण कामकाज एकाच छताखाली चालेल, अशी इमारत शोधण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article