कोकणचा सर्वांचा आवडता शिमगोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शहराजवळील मिऱ्या गावात प्रथेप्रमाणे रविवारी (ता. १५) महाशिवरात्रीच्या दिवशी शिमगोत्सवाला प्रारंभ झाला. देवीच्या स्थानावरून पवित्र पाणी आणून ते जाकिमिऱ्या येथील श्री नवलाई-पावणाई मंदिरात देवीच्या गादीवर रूजू करण्यात आले. या प्रथेला जवळपास ११३ वर्षांची परंपरा लाभली आहे. फाकपंचमीला शिमगोत्सवाला सुरुवात होते. शिमगोत्सवात पालखी खेळवणे, संकासुर, होळी उभी करणे अशा विविध प्रथा कोकणवासीय आनंदाने जपतो. मिऱ्या गावातील शिमगोत्सवातील या अनोख्या प्रथेबद्दलची माहिती मांडवीतील युवक साई खेऊर याने सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आणली आहे. या प्रथेबद्दल ग्रामस्थांनी सांगितले की, मिऱ्या गावात डोंगरातून देवीचे पवित्र पाणी आणून ते मंदिरात गादीवर रुजू करून शिमगोत्सवाला सुरुवात केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी देवीच्या मूळ स्थानी जलपूजनासाठी मानकरी, गुरव आणि ग्रामस्थ मंडळी ढोल-ताशांच्या गजरात पोहोचतात. तेथे मानकरी व गुरव देवीची पूजा, अर्चा, आरती करतात. त्यानंतर प्रसाद वाटप केले जाते.
या वेळी पवित्र जलकुंडातील देवीचे पाणी एका कलशामध्ये घेतले जाते. अशी दोन स्थाने आहे तिथे पूजा, अर्चा केली जाते. महाशिवरात्रीला पाणी आणणे म्हणजे देवीच्या मूळ स्थानावरून त्यांना असलेल्या मंदिरातील गादीवर आणण्याची प्रथा आहे. मिऱ्याच्या चहूबाजूला खारे पाणी आहे. विहीर खणली तर पाणी मचूळ असते. परंतु देवीच्या ठिकाणी गोडे पाणी असते. देवीचा उगम असल्याने प्रथेप्रमाणे हे पाणी पूजन करून आणले जाते.
कधीही खंड नाही – जाकिमिऱ्या येथील श्री नवलाई-पावणाई मंदिरातली ही प्रथा आगळीवेगळी म्हणावे लागेल. या प्रथेबद्दल मानकरी, गावकरी, ग्रामस्थांनी माहिती दिली आहे. श्री नवलाई-पावणाई देवस्थान १९१३ पासून स्थापन झाले. या मंदिराचा शिमगोत्सव महाशिवरात्रीपासून प्रारंभहोतो. याकरिता वाऱ्यावरून पाणी आणलं जातं. डोंगरात दोन जलकुंडातून पाणी आणलं जातं व ते गादीवर रूजू केले जातं. यासाठी मोठ्या संख्येने मानकरी, ग्रामस्थ उत्साहाने सहभागी होतात. या प्रथेत कधीही खंड पडलेला नाही.
