शहराजवळील भाट्ये समुद्रकिनारा हा सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांची अडचण लक्षात घेऊन फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या वतीने विशेष रबराचा वॉकवे (चालण्याचा मार्ग) बसवण्यात आला आहे. या मार्गामुळे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितपणे समुद्रकिनाऱ्यापर्यंत जाऊन पाण्याचा आनंद घेणे शक्य होणार आहे. भाट्ये किनाऱ्यावर बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्ती पर्यटनासाठी येत असतात. मात्र, वाळूवरून त्यांना चालणे कठीण बनते. तसेच, व्हीलचेअर सुद्धा नीट नेता येत नाही. त्यामुळे त्यांना समुद्रकिनाऱ्यापर्यंत पोहोचणे शक्य होत नाही व त्यांना वाळूतला किंवा फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव समुद्राच्या पाण्यातला आनंद लुटता येत नाही.
फाउंडेशन गेली ३० वर्षे आरोग्य, शिक्षण, पर्यावरणपूरक, सामाजिक उपक्रम यामध्ये पूर्ण भारतात काम करत आहे. याच अनुषंगाने दिव्यांग विद्यार्थी, त्यांच्या पालकांसाठी भाट्ये बीचवर एक दिवसीय सहलीचे आयोजनही करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध खेळ, उपक्रम आणि निसर्गानुभव यांचा मनमुराद आनंद घेतला. या सहलीला मुकुल माधव विद्यालय व फिनोलेक्स अॅकॅडमी कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन दिव्यांग मुलांना करमणुकीचाही आनंद दिला. या कार्यक्रमाला भाट्ये ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रीती भाटकर, ग्रामपंचायत सदस्य, सचिन सारोळकर, फिनोलेक्स कंपनीचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
