चिपळूण नगरपालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असूनही तिचा वापर सुरूच ठेवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सविस्तर तक्रार अर्ज सादर करून तत्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करून इमारतीचा वापर बंद करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. बांधण्यात आलेल्या या इमारतीला सुमारे ८२ वर्षाहून अधिक कालावधी झाला असून तांत्रिकदृष्ट्या या इमारतीचे आयुर्मान संपुष्टात आले आहे. इमारतीच्या छताचे प्लास्टर वारंवार कोसळत असून यापूर्वीही स्लॅबचे तुकडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळ्यात गळती लागणे, छताचे थर उखडणे यामुळे ही इमारत दिवसेंदिवस धोकादायक होत आहे. ४ मे २०२२ रोजी त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत लेखी तक्रार करून प्रत्यक्ष भेटही घेतली होती.
त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चिपळूण मुख्याधिकाऱ्यांना स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मात्र, तब्बल तीन वर्षे उलटूनही पालिकेकडून ना ऑडिट करण्यात आले, ना कोणतीही दुरुस्ती किंवा मजबुतीकरणाची उपाययोजना करण्यात आली, असा आरोप अर्जात करण्यात आला आहे. या इमारतीत रोज शेकडो नागरिक, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी ये-जा करीत आहेत. अशा परिस्थितीत भूकंप, वादळी वारे किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती आल्यास मोठ्या प्रमाणात प्राण व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही अर्जात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
