सर्व रतिमहारथी फलंदाजांच्या भ्रमाचा भोपळा फुटत असताना कर्णधार सूर्यकुमार यादव आघाडीवर राहून लढला ४९ चेंडूत नाबाद ८४ धावांची खेळी साकार केली त्यामुळे टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यात ६ बाद ७७ अशा संकटात सापडलेल्या भारताला अमेरिकेविरुद्धच्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजीत ९ बाद १६१ धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्धची मालिका आणि आफ्रिकेविरुद्धचा सराव सामना यात दणकेबाज फलंदाजी करणाऱ्या भारतीयांकडून आज तशाच स्फोटक फलंदाजीची अपेक्षा होती, परंतु डावाच्या पहिल्या तीन चेंडूत वात पेटता पेटत नव्हती तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली होती. सौरव नेत्रावळकरचे पहिले तीन चेंडू चांगलेच स्वींग झाले आणि ते खेळणे ईशान किशनला कठिण गेले. या षटकात त्याने षटकार मारला, परंतु तो जेमतेम सीमारेषेबाहेर गेला. दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करणाऱ्या अली खान याचा वेग नेत्रावळकरपेक्षा अधिक होता आणि पहिल्या चेंडूवर अभिषेक शर्मा सीमारेषेवर झेल देऊन बाद झाला. अभिषेक गेल्या पाचपैकी तीन सामन्यांत शुन्यावर बाद झाला आहे.
दुखापतीनंतर संघात परतणाऱ्या तिलक वर्माने सौवरच्या पुढच्या षटकांत आक्रमक फटके मारले. या षटकांत एकूण १६ धावा काढण्यात आल्या. तीन षटकांत १ बाद २५ अशी सुरुवात होती. अडखळत खेळणाऱ्या ईशानचा झेल तो १० धावांवर खेळत असताना सुटला. तरीही तो सावध झाला नाही. क्षेत्ररक्षण मयदिच्या अखेरच्या षटकात खर तर अधिक धावा फटकावण्यावर भर असतो, परंतु भारताने या षटकात तीन फलंदाज गमावले. त्यामुळे १ बाद ४५ वरून ४ बाद ४६ अशी घसरगुंडी उडाली त्यामुळे उगारलेल्या तलवारी म्यॅन कराव्या लागल्या. ईशान किशन सोपा झेल देऊन बाद झाला त्यानंतर तिलक वर्मा आणि शिवम दुबे हळूवार चेंडूवर फसले. दुबेला तर भोपळाही फोडता आला नाही. पडझड होत असताना रिंकू सिंगला सहाव्या क्रमांकावर पाठवण्यात आले. पण तोही आज अडखळत होता. सहा धावांसाठी त्याने १४ चेंडू घेतले अखेर त्यानेही विकेट बहाल केली.
या दरम्यान २७ चेंडूत एकही चौकार-षटकार मारण्यात आला नाही. तसेच शुभम रांजणेला स्वतःच्याच चेंडूवर सूर्यकुमारचा झेल पकडता आला नाही. रिंकू बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्याकडून अपेक्षा होत्या, परंतु त्यानेही खराब फटका मारून विकेट बहाल केली. परिणामी १३ व्या षटकांत अक्षर पटेलच्या रुपाने अखेरचा प्रमुख फलंदाज मैदानात आला. सूर्यकुमार आणि अक्षर यांनी नेत्रावळकर टाकत असलेल्या डावातील १६ व्या षटकात २१ धावा वसुल केल्या. भारतीय पाठीराख्यांना थोडेसे हायसे वाटले, परंतु पुढच्या षटकांत अक्षरनेही इतर फलंदाजांप्रमाणे चुक केली. अखेर सूर्यकुमार यादवने नेत्रावळकरच्या अखेरच्या षटकात दोन चौकार आणि दोन षटकारांसह २० धावा काढल्या त्यामुळे भारताला १६० धावांपर्यंत मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक : भारत २० षटकांत ९ बाद १६१ (ईशान किशन २० – १६ चेंडू, १ चौकार, २ षटकार, अभिषेक शर्मा ०, तिलक वर्मा २५ १६ चेंडू, ३ चौकार, १ षटकार, सूर्यकुमार यादव नाबाद ८४ – ४९ चेंडू, १० चौकार, ४ षटकार, शिवम दुबे ०, रिंकू सिंग ६, हार्दिक पंड्या ५, अक्षर पटेल ११, शेंडली वॅन रॉल्कविक ४-०-२५-४, सौरव नेत्रावळकर ४-०-६५-०, हरमीत सिंग ४-०-२६-२)
