सुवर्णदुर्ग-गोवा किल्ला ‘रोप वे’ मंजूर – योगेश कदम

सुवर्णदुर्ग किल्ल्याला युनेस्कोचा दर्जा मिळाल्याने पर्यटकांची संख्या वाढत आहे.

Must read

पर्यटनवाढीसाठी सुवर्णदुर्ग ते गोवा किल्ल्ला रोपवे प्रकल्पाला शासनाने मंजुरी दिली आहे, तसेच किल्ल्याजवळ जेटी उभारणीसाठी ८ कोटींचा निधीही दिला आहे. त्यामुळे हर्णैतोल पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यातील युनेस्को दर्जा प्राप्त ११ गडकिल्ल्यांवर ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गडकिल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत हर्णे येथील सुवर्णदुर्ग किल्ला येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यमंत्री कदम व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या हस्ते झाले. ‘मानाचा मुजरा, हटवू या कचरा’ या संकल्पनेवर आधारित उपक्रमात स्थानिक शिवप्रेमी, जय शिवराय प्रतिष्ठान व ‘ऐतिहासिक भटकंती’ समूहाचे सदस्य सहभागी झाले होते. याप्रसंगी मंत्री कदम म्हणाले, “सुवर्णदुर्ग किल्ल्याला युनेस्कोचा दर्जा मिळाल्याने पर्यटकांची संख्या वाढत आहे. हा ओघ अधिक वाढावा, यासाठी केंद्र व राज्यशासनाच्या माध्यमातून समुद्रातील सुवर्णदुर्ग आणि जमिनीवरील गोवा किल्ला यांना जोडणारा रोपवे प्रत्यक्षात येणार आहे.

राज्यशासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्याची जबाबदारी आम्ही निश्चित पार पाडू, तसेच किल्ल्यावर जलशुद्धीकरण प्रकल्प उभारून पर्यटकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केली जाणार आहे. किल्ल्यातील सातही तळ्यांची स्वच्छता करून त्यातील बारमाही पाण्याचा उपयोग पर्यटकांसाठी करण्यात येईल. “शिवजयंतीनिमित्त आज किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व आरती करण्यात आली. घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. जय शिवराय प्रतिष्ठानतर्फे स्वच्छतामोहीम राबवून पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. हा किल्ला केंद्रशासनाच्या पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित येतो. या किल्ल्याच्या संवर्धनासाठी पावले उचलली जात असून, जेटी उभारणीकरिता ८ कोटींचा निधी मिळाला आहे. त्यासाठी आवश्यक परवानग्याही मिळाल्या आहेत. राज्य पुरातत्त्व विभाग व पर्यटन विभागाच्या समन्वयातून कामे हाती घेतली जाणार आहेत.

नव्याने सापडलेल्या दरवाजाची माहिती – दरम्यान, जय शिवराय प्रतिष्ठानने किल्ल्यावर स्वच्छतामोहीम राबवून पुतळ्याची प्रतिष्ठापना केली. ‘ऐतिहासिक भटकंती’ या शिवप्रेमी समूहाने किल्ल्यातील प्राचीन कोरीवकाम व पूर्वेकडील नव्याने सापडलेल्या दरवाजाची माहिती मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याची पाहणी मंत्री कदम यांनी केली.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article