रत्नागिरीत सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटन वाढत आहे; परंतु अनेकदा पर्यटकांचा अतिउत्साह किंवा अनावधानाने होणाऱ्या चुका अंगलट येतात. तसाच एक प्रकार काल (ता. २६) रात्री मांडवी समुद्रकिनाऱ्यावर झाला. पुणे येथून पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबाची खासगी मिनी बस थेट किनाऱ्यावर घातल्याने ती वाळूत रुतल्याने मोठे संकट ओढवले. भरतीचे पाणी वेगाने वाढत होते आणि गाडीचे चाक वाळूत खोलवर रुतले होते. यामुळे पर्यटक आणि चालकाचा जीव टांगणीला लागला होता; मात्र नगरसेवक निमेश नायर यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि नगरपालिकेच्या मदतीमुळे हे संकट टळले आणि जेसीबीने गाडी बाहेर काढण्यात यश आले. काल (ता. २६) रात्रीच्या सुमारास पुणे येथून पर्यटकांना घेऊन आलेली एक खासगी मिनी बस मांडवी जेटोच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आली होती. चालकाने अतिउत्साह दाखवत गाडी थेट बीचवर घालून वळवण्याचा प्रयत्न केला आणि तो त्याच्या अंगलट आला. गाडीचे चाक वाळूमध्ये फसले आणि गाडी रूतली. दुसरीकडे समुद्राला भरती सुरू असल्याने पाण्याची पातळी वेगाने वाढत होती.
पाणी गाडीच्या जवळ येत असल्याने गाडीतील पर्यटक आणि चालक भयभीत झाले होते. जर वेळेत मदत मिळाली नसती तर गाडी समुद्राच्या पाण्यात ओढली जाण्याची भीती निर्माण झाली होती. या घटनेची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक निमेश नायर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता रत्नागिरी नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. रात्रीच्या वेळीही नगर परिषदेची टीम जेसीबी घेऊन घटनास्थळी दाखल झाली. तत्परता दाखवत या टीमने जेसीबीच्या साहाय्याने वाळूत फसलेली बस सुरक्षितपणे बाहेर काढली. गाडी बाहेर निघताच पुणेकर पर्यटकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
पर्यटकांनी मानले आभार – संकटकाळी धावून आलेले नगरसेवक निमेश नायर, त्यांची टीम आणि रत्नागिरी पालिकेचे कर्मचारी यांचे पर्यटकांनी हात जोडून आभार मानले. या वेळी घटनास्थळी रोहित मायनाक, चेतन शिवलकर, नीरज शिवलकर, साहिल भुवड आणि रोहित शिवलकर उपस्थित होते. त्यांनीही मदतकार्यात सहभाग घेतला.
