कोकणचे महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीत सध्या कडाक्याची थंडी असून, तापमानाचा पारा ७.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. गेल्या २४ तासांत दापोलीच्या हवामानात मोठे बदल पाहायला मिळत असून, दिवसाचा उकाडा आणि रात्रीचा गारठा यामुळे नागरिकांना दुहेरी हवामानाचा सामना करावा लागत आहे. जानेवारी महिन्यातील ही सर्वात नीचांकी नोंद असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ‘ग्रामीण कृषी मौसम सेवा’ विभागाने दिलेल्या नोंदीनुसार, गेल्या २४ तासात किमान तापमानः ७.४ अंश सेल्सिअस असून कमाल तापमान ३२.४ अंश सेल्सिअस इतके आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. मागील वर्षी याच तारखेला किमान तापमान ११.७ अंश सेल्सिअस होते, जे यंदा ७.४ अंशापर्यंत खाली आले आहे. म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा तापमान ४.३ अंशांनी अधिक घसरले आहे.
दुपारच्या वेळी तापमान ३२.४ अंशांपर्यंत जात असल्याने उन्हाचा चटका जाणवतो, तर रात्री आणि पहाटे तापमान थेट ७ अंशांपर्यंत खाली येत आहे. या कमाल आणि किमान तापमानातील प्रचंड तफावतीमुळे (सुमारे २५ अंश सेल्सिअसचा फरक) मानवी प्रकृतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. सर्दी, खोकला आणि तापाचे प्रमाण वाढू शकत असल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झालेली होती. मागील काही वर्षात कमी तापमानाची नोंद जानेवारी महिन्यात झालेली होती. यंदाच्या हंगामात प्रथमच तापमानाचा पारा ७.४ अंशावर आलेले असल्याचे हवामान केंद्राकडून सांगण्यात आले.
