रत्नागिरी पालिकेत चार कोटींचा शौचालय घोटाळा : तिवरेकर

१ हजार रुपयांची वस्तू चक्क ५ हजार रुपये दाखवून बिले काढण्यात आली आहेत.

Must read

रत्नागिरी पालिकेवर ४५ कोटींचा आर्थिक बोजा असताना पालिकेतील एक मोठा घोटाळा समोर आला आहे. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष आणि भाजपचे नगरसेवक समीर तिवरेकर यांनी नगरपालिकेतील तब्बल चार कोटी रुपयांचा ‘शौचालय घोटाळा’ उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. ‘कर्मचाऱ्यांनी बनावट कामे करून पैसे लाटायचे आणि त्याची शिक्षा मात्र कर रूपाने पैसे भरणाऱ्या सामान्य नागरिकांना द्यायची, असे चालणार नाही.’ या प्रकरणाच्या तळाशी आम्ही जाऊ, अशी घोषणा उपनगराध्यक्ष तिवरेकर यांनी केल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. समीर तिवरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरात एकूण ८० सार्वजनिक शौचालये आहेत. गेल्या चार वर्षांत पालिकेवर लोकप्रतिनिधी नसताना म्हणजेच प्रशासक राजवटीत या शौचालयांच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या नावावर मोठा भ्रष्टाचार झाला.

तिवरेकर यांनी कागदपत्रांची पडताळणी केली. दुरुस्तीसाठी वापरलेली १ हजार रुपयांची वस्तू चक्क ५ हजार रुपये दाखवून बिले काढण्यात आली आहेत. एकाच शौचालयाच्या दुरुस्तीच्या नावावर दोन ते तीनवेळा खर्च करण्यात आला. विशेष म्हणजे ही सर्व बिले मंजूर होऊन पैसेदेखील दिले गेले आहेत. कागदोपत्री कोट्यवधींचा खर्च होऊनही आजच्या घडीला शहरातील शौचालयांची अवस्था अत्यंत बिकट आहे. काम न करताच बिले लाटल्याचा हा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे तिवरेकर यांनी सांगितले. आंजच्या घडीला नगरपालिकेच्या खात्यात फक्त १२ लाख रुपये शिल्लक आहेत तर पालिकेला कंत्राटदार आणि इतरांचे तब्बल ४५ कोटी रुपये देणे बाकी आहे. कर्मचाऱ्यांनी केलेल्या या उधळपट्टीचा ४५ कोटींचा बोजा आता रत्नागिरीतील सामान्य नागरिकांवर करवाढीच्या स्वरूपात पडणार आहे. प्रशासक राजवटीत अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभार केल्याचा आरोप तिवरेकर यांनी केला आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article