HomeRatnagiriदिशादर्शक फलक नसल्याने पर्यटकांना मनस्ताप रत्नागिरीतील स्थिती

दिशादर्शक फलक नसल्याने पर्यटकांना मनस्ताप रत्नागिरीतील स्थिती

शहराच्या अंतर्गत भागातील अरूंद रस्ते आणि वन वे नियमांमुळे अनेकदा गोंधळ उडतो.

नाताळची सुटी आणि सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्ष स्वागतासाठी रत्नागिरी शहरात पर्यटकांचा महापूर लोटला आहे. शिवसृष्टी, थिबा पॅलेस येथील श्री-डी मल्टीमीडिया शो आणि तारांगण या ठिकाणी पर्यटकांची गर्दी आहे; मात्र शहरात ठिकठिकाणी दिशादर्शक फलक नसल्यामुळे या पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागत असून, आनंदाच्या वातावरणात विरजण पडत असल्याचे चित्र दिसत आहे. शहराचा कायापालट करण्यासाठी गेल्या काही वर्षात कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आला आहे. विशेषतः ऐतिहासिक थिबा पॅलेस परिसरात सुरू झालेला थ्रीडी शो आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भव्य शिवसृष्टी पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरत आहे. यासोबत अत्याधुनिक तारांगण पाहण्यासाठीही लोकांची मोठी गर्दी होत आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेमुळे मोठी चालना मिळत असली तरीही प्रशासकीय नियोजनातील एका त्रुटीमुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. मुंबई, पुणे आणि कोल्हापूर यासारख्या शहरातून येणाऱ्या पर्यटकांना रत्नागिरी शहरात प्रवेश केल्यानंतर नेमकी पर्यटनस्थळे कुठे आहेत, हे समजण्यासाठी आवश्यक असलेले दिशादर्शक फलक (साइन बोर्डस) मुख्य चौकांमध्ये उपलब्ध नाहीत.

गुगल मॅपचा आधार घेऊन अनेक पर्यटक मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात; मात्र शहराच्या अंतर्गत भागातील अरूंद रस्ते आणि वन वे नियमांमुळे अनेकदा गोंधळ उडतो. यामुळे पर्यटकांना एकाच ठिकाणावरून पुन्हा पुन्हा फेऱ्या माराव्या लागत आहेत. सर्वात मोठी अडचण सीएनजी वाहने घेऊन येणाऱ्या पर्यटकांना येत आहेत. सध्या सीएनजी पंपाची संख्या मर्यादित असल्याने आणि त्यांचे नेमके स्थान दर्शवणारे फलक नसल्याने पर्यटकांना स्थानिकांकडे वारंवार विचारणा करावी लागत आहे. अनेकवेळा पंपावर पोहोचण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब केल्याने पर्यटकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. पर्यटनस्थळांचा शोध घेताना तासनतास वाया जात असल्यामुळे पर्यटक हतबल झाले आहेत.

प्रशासनाने तोडगा काढावा – पर्यटनाच्यादृष्टीने जागतिक नकाशावर रत्नागिरीचे नाव पोहोचवण्याचा प्रयत्न होत असताना मूलभूत सोयी-सुविधांकडे झालेले हे दुर्लक्ष पर्यटनावर परिणाम करू शकते. नवनवीन प्रकल्प राबवले जात आहेत. प्रशासनाने मुख्य रस्ते, नाके आणि चौकांमध्ये आकर्षण व स्पष्ट दिशादर्शक फलक लावणे गरजेचे होते, असे पर्यटकांचे मत आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गर्दी वाढत राहणार असल्याने प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी आता स्थानिक व्यावसायिक आणि पर्यटकांकडून केली जात आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments