सध्या पावस परिसरामध्ये अनेक धार्मिक ठिकाणी व समुद्रकिनारी फिरायला येणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गणेशगुळे, गावखडी, पूर्णगड समुद्रकिनाऱ्याबरोबरच पावसचे स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरात मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. या ठिकाणी पर्यटकांसाठी बोटीमधून गौतमी कांदळवन फिरण्यासाठी व्यवस्था गेल्या वर्षी सुरू झाली. त्याला पर्यटकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. यावर्षीसाठी कांदळवन परिसर फिरण्यासाठी परवानगीची प्रतीक्षा येथील महिलागटाला आहे. पावस परिसरामध्ये समुद्रकिनारा, धार्मिक स्थळे, गडकिल्ल्यांमुळे मोठ्या संख्येने पर्यटकांबरोबरच शैक्षणिक सहलीही येत आहेत. या व्यतिरिक्त येथील पर्यटकांना गौतमी खाडीमध्ये कांदळवन परिसरामध्ये बोटिंगची व्यवस्था सुरू करण्यात आली.
त्यामुळे या परिसरातील महिलागटाला एक व्यवसायाचे साधन उपलब्ध झाले. गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसादही मिळला. पहिल्या वर्षामध्ये अडीचशे ते तीनशे पर्यटकांनी याचा लाभ घेतला; परंतु या खाडीमध्ये गाळाचे प्रमाण जास्त असल्यामुळे भरतीच्या वेळी बोटसफारी करता येते. येथील खाडीपरिसर अतिशय सुंदर असल्याने अनेकांची पावले या कांदळवन पर्यटनाकडे वळत आहेत; परंतु या व्यवसायाला अद्याप संबंधित खात्याने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ असली तरी परवानगी नसल्याने कांदळवन सफारीचा आनंद त्यांना लुटता येत नाही.
